बाबूश पॅनल विरोधात ५ जण रिंगणात

ताळगाव पंचायत निवडणूक : आतापर्यंत १७ उमेदवारी अर्ज दाखल

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
17th April, 12:40 am
बाबूश पॅनल विरोधात ५ जण रिंगणात

पणजी :  ताळगाव पंचायत निवडणुकीसाठी मंगळवारी आणखी ५ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. या निवडणुकीसाठी आतापर्यंत १७ उमेदवार रिंगणात आहेत. २८ एप्रिल रोजी होणाऱ्या ताळगाव पंचायत निवडणुकीसाठी प्रभाग ३ मधून २, तर प्रभाग ५, ८ आणि ९ मधून प्रत्येकी एक अर्ज दाखल झाला आहे.

ताळगाव प्रभाग ३मधून एमी रॉड्रिग्स आणि प्रतिमा शिरोडकर, प्रभाग ५ मधून दिशा मुरगावकर, प्रभाग ८ मधून इमान दिएगो डायस आणि प्रभाग ९ मधून वनिता वेळुस्कर यांनी पणजी मामलेदार कार्यालयात अर्ज दाखल केले आहेत. हे उमेदवार बाबूश मोन्सेरात यांच्या पॅनल विरोधात लढणार आहेत. गेल्या आठ दिवसांपूर्वी बाबूश यांच्या पॅनलच्या सर्व ११ उमेदवारांनी एकाच वेळी अर्ज दाखल केले होते.

ताळगाव  प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट फ्रन्ट या नावाने मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी आपले पॅनल तयार केले आहे. प्रभाग ३ मधील बाबूश पॅनलमधील उमेदवार हेलेना परेरा यांच्याविरुद्ध एमी रॉड्रिग्स आणि प्रतिमा शिरोडकर यांचा सामना होणार आहे. प्रभाग ५ मधील बाबूशचे उमेदवार उशांत काणकोणकर हे दिशा मुरगावकर विरोधात, प्रभाग ८ मधील बाबूश पॅनलच्या मारिया फर्नांडिस इमान डिएगो डायस आणि प्रभाग ९ मधील बाबूशाच्या उमेदवार संजना दिवकर यांची वनिता वेळुस्कर यांच्या विरोधात लढत होणार आहे.

अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत २० एप्रिल
उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत १८ एप्रिल असून १९ एप्रिल रोजी अर्जाची तपासणी केली जाईल. तर २० एप्रिल ही अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत असून ताळगाव पंचायतीची निवडणूक रविवार, दि. २८ एप्रिल रोजी होणार असून, निकाल २९ एप्रिल रोजी जाहीर होणार आहे.

हेही वाचा