द. गोव्यात चिन्हे लोडिंग प्रक्रियेवर सदानंद वायंगणकर यांचा आक्षेप

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
29th April, 03:11 pm
द. गोव्यात चिन्हे लोडिंग प्रक्रियेवर सदानंद वायंगणकर यांचा आक्षेप

मडगाव : दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात ईव्हीएम मशिनमध्ये चिन्हे लोड करण्याचे काम सुरू आहे. ‘करप्शन अबोलिशन पार्टी’चे सदानंद वायंगणकर यांनी मॅन्युएलविना व योग्य पद्धत न वापरता चिन्हे घातली जात असून निवडणूक आयोगाच्या निर्देशाचे पालन केले जात नसल्याचे सांगत या प्रक्रियेला आक्षेप नोंदवलेला आहे.

सासष्टी तालुक्यातील चार विधानसभा मतदारसंघांतील ईव्हीएममध्ये चिन्हे लोडिंग युनिटमध्ये चिन्ह लोड करण्याची प्रक्रिया रविवारी दिवसभर चालली व रात्री उशिरा अवघ्या मॉक पोलिंगची प्रक्रिया संपली. सासष्टीच्या उर्वरित चार मतदारसंघांतील ईव्हीएमच्या युनिटमध्ये उमेदवारांची चिन्हे लोड करण्यासाठी सोमवारी सकाळी सुरुवात झाली. करप्शन अबोलिशन पार्टीचे अध्यक्ष सदानंद वायंगणकर हे प्रतिनिधी म्हणून दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित होते. त्यांनी सोमवारीही चिन्हे लोडिंगचे काम प्रक्रियेनुसार न होता केवळ करायचे म्हणून काम केले जात असल्याचा आरोप केला. चिन्हे लोडिंगचे काम सदोष झाल्यास पुढील प्रक्रिया योग्य कशी होईल, असे सांगत आक्षेप घेतलेला आहे. निवडणूक अधिकाऱ्यांनी मॅन्युअलमधील मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करण्याचा आग्रह धरलेला आहे.

ज्या खोलीत ईव्हीएमवर चिन्हे लोडिंग केली जातात त्या ठिकाणी आवश्यक अभियंत्यांपेक्षा जास्त अभियंत्याची हजेरी होती. अभियंता,  पोलीस अधिकारी व जिल्हाधिकारीही मोबाईल घेऊन त्या सभागृहात आले होते, असे वायंगणकर यांनी सांगत निवडणूक आयोगाच्या सूचनांची पायामल्ली सुरू असल्याचे सांगितले. युनिटमध्ये चिन्ह लोड करण्यासाठी इतर अनेक फाईल्स असलेले संगणक वापरले जातात. आधीची चिन्हे डिलीट कशी केली जातात, किती चिन्हे एकावेळी राहू शकतात, क्षमता किती याबाबत अभियंत्यांना ज्ञान नाही. चिन्हे अपलोडचे मॅन्युएल उपलब्ध नाही, प्रक्रिया पूर्ण झाल्यावर लेखी काहीच दिलेले नाही, मोबाइल कक्षात आणले जातात व निवडणूक आयोगाच्या निर्देशाचे पालन केले जात नाही, असे वायंगणकर यांनी आक्षेप घेतलेले आहेत.

हेही वाचा