मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या नावे व्हॉट्सअॅपचे बनावट अकाऊंट

गुन्हा नोंदवून सायबर पोलिसांकडून तपास सुरू


17th April, 12:38 am
मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या नावे व्हॉट्सअॅपचे बनावट अकाऊंट

प्रतिनिधी । गोवन वार्ता
पणजी : देशात तसेच राज्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असताना चक्क गोव्याचे मुख्य निवडणूक अधिकारी रमेश वर्मा (आयएएस) यांचे बनावट व्हॉट्सअॅप अकऊंट तयार करण्यात आल्याचे समोर आले आहे. अशा प्रकारे सायबर गुन्हेगारांनी पोलिसांसमोर आव्हान निर्माण केले आहे. या प्रकरणी गोवा पोलिसांच्या सायबर विभागाने गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
सायबर गुन्हा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी मुख्य निवडणूक अधिकारी रमेश वर्मा (आयएएस) यांच्या वतीने त्यांचे खासगी साहाय्यक उमिता भंडारी यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, १५ एप्रिलपूर्वी +९७७९८२६५८११३९ या क्रमांकधारकाने वर्मा यांच्या नावाने बनावट व्हॉट्सअॅप अकाऊंट उघडले. संशयिताने त्यासाठी वर्मा यांचे नाव आणि फोटो वापरला आहे. त्याने या अकऊंटद्वारे आर्थिक मदत मागितली आहे, असे तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीची दखल घेऊन सायबर विभागाचे पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता आणि उपअधीक्षक आशिष शिरोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक दीपक पेडणेकर यांनी अज्ञात मोबाईलधारकाच्या विरोधात माहिती व तंत्रज्ञान कायद्याचे कलम ६६सी कलमाअंतर्गत गुन्हा नोंद केला असून तपास सुरू केला आहे.            

हेही वाचा