ताळगाव पंचायतीवर पुन्हा बाबूश मोन्सेरात पॅनलचाच झेंडा; ११ ही प्रभागांत उमेदवार विजयी

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
29th April, 12:56 pm
ताळगाव पंचायतीवर पुन्हा बाबूश मोन्सेरात पॅनलचाच झेंडा; ११ ही प्रभागांत उमेदवार विजयी

पणजी : ताळगाव पंचायतीवर पुन्हा मंत्री बाबूश मोन्सेरात यांच्या पॅनलचा झेंडा फडकला आहे. या पंचायतीवर पॅनलचे सर्वच्या सर्व म्हणजे ११ उमेदवार विजयी झाले आहेत. या पंचायतीच्या अकरापैकी चार प्रभागांतील उमेदवारांची अगोदरच बिनविरोध निवड झाली होती. सात प्रभागांसाठी काल (ता. २८) रोजी ६८.७९ टक्के मतदान झाले होते. आज सकाळी मतमोजणी झाल्यानंतर एकूण निकाल जाहीर करण्यात आला.

प्रभाग एक, सहा, दहा आणि अकरामधील उमेदवारांची अगोदरच बिनविरोध निवड झाली आहे. उर्वरित सात प्रभागांमध्ये एकूण १४ उमेदवार रिंगणात होते. यावेळी ताळगाव पंचायतीच्या निवडणुकीत मंत्री बाबूश मोन्सेरात यांच्या पॅनल​विरोधात इंडी आघाडीच्या घटक पक्षांनी एकत्र येत उमेदवार दिले होते. त्यामुळे पंचायत निवडणूक चुरशीची होईल, असा अंदाज होता. परंतु, बाबूश पॅनलचे प्रभाग एकमधील उमेदवार सिद्धी केरकर, प्रभाग सहामधील एस्टेला डिसोझा, प्रभाग दहामधील सागर बांदेकर आणि अकरामधील सिडनी पॉल बार्रेटो यांची बिनविरोध निवड झाल्याने पंचायतीवर पुन्हा बाबूश गटाचीच सत्ता स्थापन होणार, हे स्पष्ट होते. अपेक्षेप्रमाणे आज निकाल जाहीर झाल्यानंतर ११ ही प्रभागांत बाबूश यांच्या पॅनलचेच उमेदवार विजयी झाले.

प्रभागनिहाय विजयी उमेदवार

प्रभाग १ सिद्धी केरकर (बिनविरोध)
प्रभाग २  आग्नेल डिकुन्हा
प्रभाग ३ हेलिना परेरा
प्रभाग ४ रतिका गावस
प्रभाग ५ उशांत काणकोणकर
प्रभाग ६ एस्टेला डिसोझा (बिनविरोध)
प्रभाग ७ जानू रुजारिओ
प्रभाग ८ मारिया जॉर्ज फर्नांडिस
प्रभाग ९ संजना संदीप दिवकर
प्रभाग १० सागर बांदेकर (बिनविरोध)
प्रभाग ११ सिडनी पॉल बार्रेटो (बिनविरोध)

हेही वाचा