दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या ३५ जणांना पोलिसांनी पकडले; एका कदंब चालकाचाही समावेश

ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्ह विशेष मोहिमेअंतर्गत कारवाई

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
16th April, 04:25 pm
दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या ३५ जणांना पोलिसांनी पकडले; एका कदंब चालकाचाही समावेश
Pic By: गिरी येथे उड्डाण पुलाखाली ट्रक चालकाची अल्कोहोल चाचणी घेताना वाहतुक पोलीस. (उमेश झर्मेकर )

 म्हापसा : ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्हच्या (दारू पिऊन वाहन चालवणे) विरोधात वाहतुक पोलिसांनी सोमवारी संध्याकाळी राबवलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत ३५ अवजड वाहन चालकांविरूध्द गुन्हा नोंदवण्यात आला. यामद्ये एका कदंब बस चालकाचाही समावेश आहे.

गेल्या शनिवारी दि. १३  रोजी कान्सा, थिवी येथे ट्रकने ठोकरल्याने दुचाकीस्वार सुजाता सुर्यकांत साळगावकर (२६ जयदेववाडा नास्नोळा) ही युवती ठार झाली होती. या अपघातास कारणीभूत संशयित ट्रक चालक प्रमोद गावस (रा. मानशी, वाळपई) हा घटनेवेळी दारूच्या नशेत वाहन चालवत होता व  चुकीच्या दिशेने जाऊन ईव्ही दुचाकीला त्याने ठोकर मारली होती. हा संशयित घटनास्थळावरून पसार झाला होता व नानोडा डिचोली येथून त्यास कोलवाळ पोलिसांनी पकडून अटक केली होती.  

या घटनेच्या पार्श्वभूमीवर वाहतुक पोलीस विभागाने पोलीस अधीक्षक राहूल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी १५  रोजी संध्याकाळच्या सत्रात ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्ह विरोधी राज्याभरात विशेष मोहिम राबवली. विशेषतः या मोहिमेंतर्गत ट्रक सारख्या अवजड वाहनांना वाहतुक पोलिसांनी लक्ष्य बनवले होते. त्यानुसार या अर्धवेळ सत्राच्या मोहिमेवेळी पोलिसांना ३५  वाहन चालक दारूच्या नशेत गाडी चालवणारे सापडले. एका कदंब बस चालकासमवेत या सर्व वाहन चालकांवर वाहन वाहतुक कायद्यानुसार गुन्हे नोंद करण्यात आले. तसेच संबंधित वाहने जप्त करण्यात आली.

 दरम्यान, या संशयित दारूड्या वाहन चालकांना  वाहतुक पोलिसांकडून संबंधीत प्रथमश्रेणी न्यायालयात हजर केले जाते. न्यायालयाकडून संशयितांना दंडात्मक आणि साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली जाते. शिवाय संशयितांचा वाहन चालक परवाना वाहतुक खात्याकडून निलंबित करण्याची शिफारस न्यायालयाकडून हा निवाडा देताना केली जाते.

हेही वाचा