मिलाग्रीस सायबिणीचे फेस्त उत्साहात


16th April, 12:20 am
मिलाग्रीस सायबिणीचे फेस्त उत्साहात

सायबिणीला तेल वाहताना भाविक. (नारायण पिसुर्लेकर)
म्हापसा :
येथील मिलाग्रीस सायबिणीचे फेस्त भक्ति भावाने सोमवारी साजरे झाले. ईस्टरच्या तिसऱ्या सोमवारी साजरे होणाऱ्या मिलाग्रीस सायबिणीच्या फेस्ताला गोव्याबरोबरच शेजारील राज्यातील भक्तगण मोठ्या संख्येने हजेरी लावतात.
भाजपचे उत्तर गोव्याचे उमेदवार श्रीपाद नाईक यांनी उपसभापती जोशुआ डिसोझा, आमदार अॅड.कार्लुसे फेरेरा, नगराध्यक्षा डॉ. नूतन बिचोलकर, स्थानिक नगरसेवक प्रकाश भिवशेट यांच्यासह इतर लोकप्रतिनिधींनी चर्चला भेट देत सायबिणीच्या मूर्तीवर तेल वाहिले.
भक्तांच्या हाकेला धावणारी सायबीण म्हणून ख्रिश्चन तसेच हिंदू व इतर समाजातील भाविकांत सायबीणीबाबत श्रद्धा आहे. फेस्तावेळी मिलाग्रीस सायबिणी व तिच्या कडेवरील येसू ख्रिस्त यांच्या पुतळ्यावर भक्तांनी तेल, फुले वाहिली.
मिलाग्रीस सायबिणीच्या फेस्तानिमित्त सेंट जेरॉम चर्चमध्ये पहाटे ५.३० पासून संध्याकाळी पर्यंत प्रार्थना झाल्या. या प्रार्थना कोकणी व इंग्रजीमध्ये झाल्या. सकाळी १० वा. फेस्ताची मुख्य प्रार्थना धर्मगुरू फा. लिओनार्डो मोराईस यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. यावेळी सहाय्यक धर्मगुरू फा.सावियो पिंटो व फा. आगुस्तीन आल्फोन्सो हे उपस्थित होते.
तत्पुर्वी चर्चमधील मिलाग्रीस सायबीन व तिच्या कडेवरील येसू ख्रिस्त यांच्या डोक्यावर मुकूट घालण्यात आला. फेस्तानिमित्त चर्चतर्फे पाच दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून पुढील सात दिवस हे फेस्त चालणार आहे. चर्च परिसरातील दोन्ही रस्त्यांच्या बाजूला वर्षपद्धतीने फेरी थाटली गेली आहे. यात कपडे, खेळणी, मिठाई, चणे, घरगुती सजावटीचे दुकाने आहेत.
मिलाग्रीस सायबीण ही शिरगावच्या श्री लईराई देवीची बहिण म्हणून भक्तगणांत ओळखली जाते. श्री लईराईची जत्रा यंदा येत्या १२ मे रोजी साजरी होणार आहे. गेल्यावर्षी फेस्त आणि जत्रा एकाचदिवशी साजरी होण्याचा योग १३ वर्षांनी आला होता. शिरगावहून मिलाग्रीस सायबिणीला तेल तर म्हापशाहून देवी लईराईला फुले भेट देण्याची परंपरा आहे. ही परंपरा कित्येक वर्षापासून अखंडीतपणे चालू आहे.
म्हापशातील धार्मिक सलोखा राखणारा हा एकमेव फेस्ताचा उत्सव आहे. नवसाला पावणारी देवी म्हणून मिलाग्रीस सायबिणीवर भक्तगणांची श्रद्धा असून यामुळे सायबीणीला तेल, मेणबत्ती व फुले अर्पण केली जातात. या दिवशी भाविक नारळाची करवंटी घेऊन भीक मागतात व आपले नवस फेडतात. ख्रिश्चन बांधवासह हिंदू व इतर समाजातील लोक या फेस्तात सहभागी होत असल्याने फेस्ताला वेगळेच महत्त्व प्राप्त झालेले आहे.        

हेही वाचा