अन्सोळे स्फोटामागे चिरेखाण व्यवसाय असल्याचा संशय

सत्तरी तालुक्यात १०० हून अधिक बेकायदेशीर चिरेखाणी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
13th April, 12:39 am
अन्सोळे स्फोटामागे चिरेखाण व्यवसाय असल्याचा संशय

वाळपई : भिरोंडा पंचायत क्षेत्रातील अन्सोळे येथे सोमवारी स्फोट झाला. स्फोटामुळे अनेक घरांचे नुकसान झाले. नुकसानीचे सर्वेक्षण अजूनही सुरू आहे. हा स्फोट जिलेटिनमुळेच झाला असल्याचा निष्कर्ष सध्या एनएसजीने काढला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात जिलेटीनचा साठा एकत्र ठेवणे कायद्याने गुन्हा आहे. यामुळे संशयित नासिर हुसेन जमादार याला अटक करण्यात आली आहे. मात्र, या स्फोटामागे चिरेखाण व्यवसाय असल्याचा संशय व्यक्त होत आहे.

चिरेखाणीच्या व्यवसायासाठी मोठ्या प्रमाणात जिलेटीनची स्फोटके लागतात. सत्तरीत १०० हून अधिक बेकायदेशीर चिरेखाणी आहेत. तरीसुद्धा सरकारची यंत्रणा याला पाठीमागे घालत असल्याचा आरोप सातत्याने नागरिकांकडून करण्यात येत आहे. मात्र, एकही चिरेखाण कायमस्वरूपी बंद करण्याचे धाडस गोवा सरकारच्या खाण व भूगर्भ खात्याच्या अधिकाऱ्यांना झालेले नाही. अन्सोळे या ठिकाणी मातीमध्ये पुरून ठेवलेला जिलेटीन हा चिरे व दगड काढण्यासाठी वापरण्यात येत असल्याची माहिती संशयित आरोपी नासिर जमादार याने दिली आहे.

सत्तरी तालुक्यातील जवळपास सर्वच पंचायत क्षेत्रामध्ये आज बेकायदेशीर चिरेखाणींचा व्यवसाय सुरू आहे. अनेकवेळा या चिरेखाणींवर छापा घालण्यात येतो. मात्र, अजून पर्यंत एकही चिरेखाण बंद झालेली नाही. अनेकठिकाणी दगड काढण्यासाठी जिलेटिनचा वापर करण्यात येत असतो.

वांते येथील व्यवसायिकावर गुन्हे, तरीही ....

वांते येथे मोठ्या प्रमाणात चिरेखाण व्यवसाय सुरू होता. व्यावसायिकांवर सरकारने गुन्हे दाखल केले. त्यांना मोठ्या प्रमाणात दंडाची कारवाई करण्यात आली. मात्र अजून पर्यंत हा दंड या व्यावसायिकांनी सरकारला भरलेला नाही. उलट या व्यावसायिकांनी या दंडाच्या विरोधात न्यायालयात आव्हान याचिका दाखल केली.

जिलेटीनच्या साठ्याची चौकशी व्हावी!

नासिर जमादार याच्याकडे हा जिलेटिनचा साठा कसा आला? या संदर्भात पोलिसांनी पाळेमुळे खोदून कारवाई करणे गरजेचे आहे. याकडे दुर्लक्ष केल्यास येणाऱ्या काळात सरकारलाच मोठ्या आव्हानांना तोंड द्यावे लागणार आहे.