अन्सोळेतील स्फोट जिलेटीनचाच!

‘एनएसजी​’चा केंद्रीय गृह मंत्रालयाला अहवाल

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
12th April, 12:17 am
अन्सोळेतील स्फोट जिलेटीनचाच!

पणजी : सत्तरी तालुक्यातील भिरोंडा ग्रामपंचायत क्षेत्रातील अन्सोळे येथील स्फोट जिलेटीनमुळेच झाल्याचा अहवाल एनएसजीने (राष्ट्रीय सुरक्षा रक्षक यंत्रणा) केंद्रीय गृह मंत्रालयाला सादर केला आहे. त्याचबरोबर या प्रकरणात आणखी काही संशयास्पद गोष्टी नजरेस आल्या नसल्याचेही अहवालात नमूद केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सोमवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास हा स्फोट झाला होता. त्यानंतर ज्या काजू फार्ममध्ये हा स्फोट झाला होता, त्या फार्मचा मालक नासीर हुसेन जमादार (५३, रा. नुहा कॉलनी, नागवे) याला वाळपई पोलिसांनी आधी ताब्यात घेऊन नंतर अटक केली होती. त्याची सखोल चौकशी केली असता, आपण डोंगर फोडण्याच्या कामासाठी हे जिलेटीन वापरत असल्याचा खुलासा त्याने केला होता. मात्र या संदर्भात सखोल चौकशी करण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा रक्षक (एनएसजी) यंत्रणा मंगळवारी घटनास्थळी दाखल झाली​ होती. त्यांनी​ पाहणी करून अहवाल केंद्रीय गृह मंत्रालयाला सादर केला. या अहवालात स्फोट जिलेटीनमुळेच झाल्याचा निष्कर्ष एनएसजीने काढला आहे. शिवाय या प्रकरणात संशय घेण्याजोगे अन्य काही नसल्याचेही नमूद केले आहे. 

हेही वाचा