गुजरात टायटन्सचा अखेरच्या चेंडूवर विजय

राजस्थानचा ३ गडी राखून पराभव : गिलची कप्तानी खेळी, रियान-संजूची अर्धशतके

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
11th April, 12:30 am
गुजरात टायटन्सचा अखेरच्या चेंडूवर विजय

जयपूर : गुजरात टायटन्सने रोमहर्षक लढतीत राजस्थान रॉयल्सचा ३ गडी राखून पराभव केला. राजस्थानचा या मोसमातील हा पहिलाच पराभव आहे. राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना १९६ धावा केल्या. प्रत्युत्तरात गुजरातने ७ गडी गमावून सामना जिंकला. गुजरातने अखेरच्या चेंडूवर सामना जिंकला. राजस्थानकडून संजू सॅमसनने नाबाद ६८ धावांची खेळी केली. रियान परागने ७६ धावा केल्या. गुजरातकडून उमेश यादव, राशिद खान आणि मोहित शर्मा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
गुजरातच्या विजयात राशिद खानने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने ११ चेंडूत नाबाद २४ धावा केल्या. राहुल तेवतियाने २२ धावा केल्या. कर्णधार शुभमन गिलने ७२ धावांची खेळी केली. साई सुदर्शनने ३५ धावा केल्या. राजस्थानकडून गोलंदाजी करताना कुलदीप सेनने सर्वाधिक ३ बळी घेतले. युजवेंद्र चहलने २ बळी घेतले. तर आवेश खानने १ गडी बाद केला.
तत्पूर्वी राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील आयपीएलच्या २४ व्या सामन्यात गुजरातने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि राजस्थानला प्रथम फलंदाजीची संधी दिली. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या राजस्थान रॉयल्सने प्रथम खेळताना २० षटकांत ३ बाद १९६ धावसंख्येपर्यंत मजल मारली. तर गुजरात टायटन्सला विजयासाठी १९७ धावांचे लक्ष्य दिले.
राजस्थान रॉयल्सची टॉप ऑर्डर यावेळीही संघर्ष करताना दिसली. गेल्या सामन्यात जोस बटलरने शतक झळकावले होते. मात्र, यावेळी तो केवळ ८ धावा करून बाद झाला. यशस्वी जैस्वालचा फॉर्म चिंतेचा विषय असून, तो केवळ २४ धावा करू शकला. राजस्थानकडून सर्वाधिक धावा रियान परागने केल्या, त्याने ४८ चेंडूत ७६ धावा केल्या. त्याच्याशिवाय संजू सॅमसननेही ३८ चेंडूत सात चौकार आणि दोन षटकारासह नाबाद ६८ धावांचे योगदान देत राजस्थान रॉयलला १९० धावांच्या पुढे नेले. शेवटच्या षटकांमध्ये, शिमरॉन हेटमायरने ५ चेंडूत १३ धावांची छोटी खेळी खेळून धावसंख्येला हातभार लावला.
सॅमसन-पराग यांच्यात १३० धावांची भागीदारी
राजस्थान संघाला १० षटकांत २ गडी गमावून केवळ ७३ धावा करता आल्याने एका क्षणी ते संघर्ष करत होते. येथून कर्णधार संजू सॅमसन आणि रियान पराग यांनी जबाबदारी स्वीकारली आणि पुढच्या ५ षटकांत ६१ धावा केल्या, त्यामुळे १५ षटकांत आरआरची धावसंख्या १३४ धावा झाली. रियान पराग आणि संजू सॅमसन थांबायला तयार नव्हते, ते सतत मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करत होते. पण १९व्या षटकात मोहित शर्माच्या चेंडूवर रियान परागने आपली विकेट गमावली. सॅमसन आणि पराग यांच्यात १३० धावांची भागीदारी झाली. तर परागने ७६ धावांच्या खेळीत ३ चौकार आणि ५ गगनचुंबी षटकार ठोकले. तर राजस्थानच्या खेळाडूंनी शेवटच्या १० षटकांत १२२ धावा केल्या.
जीटीच्या गोलंदाजांचा धुव्वा
गुजरात टायटन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता, जो सुरुवातीला त्यांच्यासाठी चांगला ठरला कारण राजस्थान रॉयल्सने केवळ ४२ धावसंख्येवर त्यांच्या दोन्ही सलामीवीरांच्या विकेट्स गमावल्या होत्या. येथून, संजू सॅमसन आणि रियान पराग यांनी उत्कृष्ट भागीदारी केली आणि त्यांनी गुजरातच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवला. रशीद खान व्यतिरिक्त, गुजरातमधील कोणीही चांगली गोलंदाजी करू शकला नाही कारण प्रत्येकाने ९ किंवा १० पेक्षा जास्त इकॉनॉमी रेटने धावा दिल्या. उमेश यादव, मोहित शर्मा आणि राशिद खान यांनाच प्रत्येकी एक विकेट घेता आली.


रियानचे गुजरातविरुद्ध धमाकेदार अर्धशतक
राजस्थानचा युवा आणि विस्फोटक फलंदाज रियान परागला आयपीएलच्या १७व्या मोसमात चांगलाच सूर गवसलेला आहे. रियानने हाच सूर कायम ठेवत गुजरात टायटन्स विरुद्ध सवाई मानसिंह स्टेडियम जयपूर येथे खणखणीत अर्धशतक ठोकले. रियानने मोहित शर्मा या अनुभवी गोलंदाजाला कडक षटकार खेचत अर्धशतक पूर्ण केले. रियानने या अर्धशतकासह आगामी टी-२० वर्ल्ड कप २०२४ साठी आपला दावा आणखी मजबूत केला आहे. रियानने ३४ चेंडूत २ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने १५५.८८ च्या स्ट्राईक रेटने हे अर्धशतक पूर्ण केले. रियानच्या आयपीएलच्या कारकीर्दीतील हे पाचवे अर्धशतक ठरले.
रियानचे ५ सामन्यांमधील तिसरे अर्धशतक
दरम्यान, रियान परागचा आणि राजस्थान रॉयल्सचा या १७व्या मोसमातील पाचवा सामना आहे. रियानने याआधीच्या ४ सामन्यांमध्ये २ अर्धशतक ठोकली आहेत. रियानने पहिल्या ४ सामन्यांमध्ये अनुक्रमे ४३, ८४*, ५४* आणि ४ अशा धावा केल्या होत्या. रियानने लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध पहिल्याच सामन्यात ४३ धावा ठोकल्या. त्यानंतर दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध ४५ बॉलमध्ये ८४ धावांची झंझावाती खेळी केली. मुंबई इंडियन्स विरुद्ध ३९ बॉलमध्ये ५४ धावा ठोकल्या. मात्र, रियान रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध अपयशी ठरला. त्या त्या सामन्यात ४ चेंडूत ४ धावा केल्या.
......
संभाव्य धावफलक
राजस्थान : २० षटकांत ३ बाद १९६ धावा
गुजरात : २० षटकांत ७ बाद १९९ धावा
सामनावीर : राशिद खान