जगातील ११४ वर्षांच्या सर्वात वृद्ध व्यक्तीचे निधन... ‘गिनीज वर्ल्ड’मध्ये नाव समाविष्ट

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
03rd April, 03:05 pm
जगातील ११४ वर्षांच्या सर्वात वृद्ध व्यक्तीचे निधन... ‘गिनीज वर्ल्ड’मध्ये नाव समाविष्ट

कॅरेकस : जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे निधन झाले आहे. व्हेनेझुएलाचे जुआन व्हिसेंट पेरेझ मोरा अशी या वयोवृद्धाचे नाव आहे. ‍‍२०२२ साली जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती म्हणून त्यांची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने ओळख केली होती. जुआन व्हिसेंटे यांचे काल (ता. २) वयाच्या ११४ व्या वर्षी निधन झाले. व्हेनेझुएलाच्या राष्ट्रपतींनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ही माहिती देताना शोक व्यक्त केला आहे.

व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिलेल्या शोकसंदेशात, ‘मी त्यांच्या कुटुंबीयांबद्दल आणि एल कोब्रेच्या सर्व लोकांप्रती संवेदना व्यक्त करतो’, असे म्हटले आहे.

जुआन व्हिसेंट पेरेझ मोरा यांचा जन्म २७ मे १९०९ रोजी झाला. वयाच्या ११२ व्या वर्षी स्पेनच्या सॅटर्निनो दे ला फुएन्टे गार्सिया यांच्या निधनानंतर, ४ फेब्रुवारी २०२२ रोजी गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने जुआन विसेंट पेरेझ मोरा यांना जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती म्हणून खिताब दिला.

जुआन विसेंट पेरेझ मोरा ११ मुलांचे वडील होते. इतकेच नाही तर २०२२ मध्ये मिळालेल्या माहितीनुसार त्यांना ४१ नातवंडे, २९ पणतवंडे आहेत. जुआन व्हिसेंट हे त्याच्या पालकांच्या दहा मुलांपैकी नववे अपत्य होते. सुरुवातीपासूनच त्यांनी कुटुंबीयांसह शेतीची कामे करण्यास सुरुवात केल्याचे सांगण्यात येते. त्यांचे शिक्षक आजारी पडल्यानंतर त्यांनी फक्त पाच महिने अभ्यास केला, त्यानंतर नोटबुकच्या मदतीने अभ्यास करून ते यशस्वी झाले.

एका अहवालात असे म्हटले आहे की, जुआन व्हिसेंट पेरेझ मोरा यांच्या उत्तम आरोग्याचे रहस्य कठोर परिश्रम हे आहे. पण, सुट्टीच्या वेळी ते शरीराला योग्य विश्रांती देत. इतकेच नाही तर ते रात्री लवकर झोपायचे. जुआन व्हिसेंट पेरेझ मोरा यांचा देवावर प्रचंड विश्वास होता आणि दिवसातून दोनदा ते जपमाळ ओढायचे.