राज्यात उष्णतेच्या लाटेची शक्यता

हवामान खात्याचा इशारा

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
03rd April, 12:54 am
राज्यात उष्णतेच्या लाटेची शक्यता

पणजी : राज्यात उन्हाचे चटके सहन करावे लागत आहेत. अशातच हवामान खात्याच्या गोवा विभागाने उष्णतेच्या लाटेची शक्यता असल्याचा अंदाज वर्तवला आहे. यानुसार राज्यात एप्रिल ते जून या दरम्यान उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. 

याकाळात कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक असण्याची शक्यता देखील खात्याने व्यक्त केली आहे. यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घेणे आवश्यक आहे.             

राज्यात उष्णतेच्या लाटेची शक्यता गृहीत धरून आरोग्य खात्यासह अन्य संस्थांनी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. यानुसार भरपूर पाणी पिणे, प्रखर उन्हात बाहेर न पडणे, सुती कपडे वापरणे अशा विविध सूचना करण्यात आल्या आहेत. दरम्यान, मंगळवारी पणजीत कमाल ३३.२ अंश सेल्सिअस कमाल, तर २४.८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. तर मुरगाव येथील कमाल तापमान ३३.४ अंश, तर किमान तापमान २५.४ अंश होते. खात्याने ६ आणि ७ रोजी तुरळक पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.   

एप्रिल १९८४ मध्ये पारा ३९.८ अंश
राज्यातील एप्रिल महिन्याची तापमानाची आकडेवारी ७ एप्रिल १९८४ मध्ये सर्वाधिक ३९.८ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली होती. त्याखालोखाल २९ एप्रिल १९९३ रोजी ३८.१ अंश तर १३ एप्रिल १९८४ रोजी ३६.७ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली होती.
एप्रिलमधील सर्वाधिक कमाल तापमान
तारीख / तापमान (अंश सेल्सिअस)
७.४.१९८४ / ३९.८
२९.४.१९९३ / ३८.१
१३.४.१९८४ / ३६.७
११.४.२०१० / ३६.४
२३.४.२०१२ / ३६.३
२२.४.२०२२ / ३६.२
९.४.२०२२ / ३६
६.४.२०१५ / ३५.९
४.४.२०१४ / ३५.८

२१.४.२०२३ / ३५.८        

हेही वाचा