अग्निशमन दलाला तीन महिन्यांत आगीबाबत ८१५ कॉल्स

वाळलेले गवत, जंगल भागातील आगींच्या प्रमाणात वाढ

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
03rd April 2024, 12:52 am
अग्निशमन दलाला तीन महिन्यांत आगीबाबत ८१५ कॉल्स

पणजी : राज्यात उन्हाळा वाढल्याने वाळलेले गवत, माळरान किंवा जंगल भागात आग लागण्याचे प्रमाण वाढत आहे. जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत अग्निशामक दलाला आगीच्या एकूण घटनांबाबत १,२३१ कॉल्स आले होते. यातील ६८६ कॉल्स हे वाळलेल्या गवताच्या आगीसाठी (५५ टक्के), तर जंगल भागातील आगीसाठी १२९ कॉल्स (११ टक्के) आले होते. हवामान खात्याने पुढील दोन महिने कमाल तापमान वाढण्याची शक्यता व्यक्त केली आहे. यामुळे अशा घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वाळलेल्या आगीसाठी आणि जंगल भागातील आगीसाठी आलेल्या ६८६ पैकी सर्वाधिक १३३ कॉल्स हे डिचोलीमधून आले होते. त्याखालोखाल म्हापशातून १०८, पेडण्यातून ९२, वास्को येथून ४९, मडगावातून ५३, वेर्णा येथून ५१, तर जुने गोवा येथून ३९ कॉल्स आले होते. केवळ जंगल भागातील आगींच्या घटना सर्वाधिक डिचोलीमध्ये घडल्या. जानेवारी ते मार्च दरम्यान डिचोलीतून जंगल भागातील लागलेल्या आगीसाठी ३२ कॉल्स आले होते. त्याखालोखाल पेडणेतून २८, वाळपईतून १४, म्हापशातून ११, कुंकळ्ळी, मडगाव आणि कुडचडे भागातून प्रत्येकी ७ कॉल्स आले होते.
गेल्या तीन महिन्यांत अग्निशामक दलाला एकूण १,७३१ कॉल्स आले होते. यातील १,२३१ आगीबाबत, तर ५०० अन्य आपत्कालीन घटना किंवा अपघातांबाबतचे होते. तालुकानिहाय आकडेवारी पाहता १,२३१ पैकी सर्वाधिक २३० कॉल्स हे बार्देश तालुक्यातून आले होते. त्यानंतर सासष्टीतून १९७, तिसवाडीतून १४७, डिचोलीतून १४५, फोंड्यातून ९९, पेडण्यातून ११७, मुरगावतून १०२, केपेतून ९२, सत्तरीतून ९१, काणकोणमधून ८१, सांगेमधून २६, तर धारबांदोडा तालुक्यातून १८ कॉल्स आले होते.
उन्हाळ्यात राज्यात वाळलेल्या गवताला किंवा जंगल भागात आगी लागण्याच्या घटना घडत असतात. गेल्या वर्षी मार्च महिन्यात राज्यातील विविध भागांत अशा घटना मोठ्या प्रमाणात घडल्या होत्या. यामध्ये विशेष करून जंगल भागाचे नुकसान झाले होते. यामुळे ४१८ हेक्टर जंगल भागाचे नुकसान झाले होते. या आगी विझवण्यासाठी अग्निशामक दलासह, स्थानिक नागरिक तसेच वायुदलाची मदत घ्यावी लागली होती. २०१७-१८ ते २०२१-२२ दरम्यान जंगल भागातील आगीमुळे ५८७ हेक्टर जंगल भागाचे नुकसान झाले होते.

तीन महिन्यात ५३ जणांना जीवदान
अग्निशमन दलाला जानेवारी ते मार्च दरम्यान ५३ व्यक्तीचे, तर १६५ प्राण्यांचे जीव वाचविण्यात यश आले आहे. तसेच विविध आपत्कालीन घटनांत १७ जणांचा यादरम्यान खात्याने सुमारे ३ कोटी रुपयांची मालमत्ता वाचवली आहे.