राज्यातील १ लाखाहून अधिक वीज ग्राहकांकडून १८१ कोटींची थकबाकी

६८ टक्के थकबाकीदार औद्योगिक ग्राहक

Story: पिनाक कल्लोळी |
29th March, 07:00 am
राज्यातील १ लाखाहून अधिक वीज ग्राहकांकडून १८१ कोटींची थकबाकी

गोवन वार्ता
पणजी : राज्यातील १ लाख ३० हजार ८७ वीज ग्राहकांनी तब्बल १८१ कोटी रुपयांची वीज बिल थकबाकी भरलेली नाही. ही थकबाकी २७ मार्च अखेरपर्यंतची आहे. यामध्ये घरगुती, व्यावसायिक, कृषी, औद्योगिक अशा विविध प्रकारच्या ग्राहकांचा समावेश आहे. सर्वाधिक १२३ कोटी रुपये औद्योगिक वीज जोडणी घेतलेल्या ग्राहकांनी थकबाकी देणे बाकी आहे. खात्याचे अधीक्षक अभियंता मयूर हेदे यांनी ही माहिती दिली.
एकूण थकबाकीपैकी घरगुती ग्राहकांकडून वीज खात्याला २४ कोटी ६६ लाख रुपये (१३.६२ टक्के) येणे बाकी आहे. तर कृषी जोडणी असणाऱ्या ग्राहकांकडून १ कोटी ८६ लाख रुपये (१ टक्के), व्यावसायिक जोडणी असणाऱ्या ग्राहकांकडून ३० कोटी ८२ लाख रुपये (१७.०२ टक्के) येणे बाकी आहे. तालुकानिहाय आकडेवारी पाहता फोंडा तालुक्यात सर्वाधिक ३५ कोटी ६१ लाख रुपये थकबाकी आहे. त्याखालोखाल डिचोली (३२.८७ कोटी) आणि सांगे (२३.०८ कोटी) यांचा क्रमांक लागतो.
खात्याला धारबांदोडा तालुक्यातून सर्वात कमी म्हणजे २ कोटी १७ लाख रुपये येणे बाकी आहे. काणकोण तालुक्यातून ३.३४ कोटी, सत्तरीतून ४.०५ कोटी, मुरगाव येथून ५.२३ कोटी, केपेतून ८.२५ कोटी, तर पेडणे तालुक्यातून १०.०७ कोटी रुपये येणे बाकी आहे. सर्व तालुक्यांत औद्योगिक वीज जोडणी असलेल्या ग्राहकांकडूनच बिले न भरण्याचे प्रमाण जास्त आहे. घरगुती जोडणीचा विचार करता २४ कोटी ६६ लाख रुपयांपैकी सर्वाधिक ६.०८ कोटी रुपये थकबाकी बार्देश तालुक्यातील आहे.
याआधी खात्याने थकित बिल भरण्यासाठी दोनवेळा वन टाईम सेटलमेंट योजना सुरू केली होती. याद्वारे थकबाकीदारांना जोडणीच्या प्रकारानुसार वीज बिल तसेच व्याज हप्त्यात भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी खात्याने थकबाकीधारकांविरोधात मोठी मोहीम सुरू केली आहे. यानुसार थकित बिल न भरल्यास तात्काळ वीज जोडणी कापण्यात येणार असल्याचे खात्याने स्पष्ट केले आहे.

सासष्टीत सर्वाधिक वीज ग्राहक

राज्यातील एकूण ग्राहकांपैकी सासष्टी तालुक्यात १ लाख ४४ हजार ३६६ वीज ग्राहक आहेत. या तालुक्यात सर्वाधिक १ लाख १७ हजार ८७४ ग्राहक आहेत. औद्योगिक आणि व्यावसायिक वीज जोडण्यात देखील सासष्टी पुढे आहे. तर फोंडा तालुक्यात सर्वाधिक २,२६३ कृषी वीजजोडण्या आहेत.
ग्राहक प्रकार
- एकूण ६ लाख ८९ हजार ३५२ सक्रिय ग्राहक.
- यातील ५ लाख ५९ हजार ५० घरगुती ग्राहक.
- १ लाख ११ हजार २६९ व्यावसायिक जोडणी.
- १२ हजार ८५५ कृषी जोडणी.
- ६११७ औद्योगिक जोडणी.
- अन्य प्रकारच्या जोडण्या ६१.

तालुका.... थकबाकीदार ग्राहकांची संख्या.... थकबाकीची रक्कम (कोटी रु.)

फोंडा........१४,९७१........३५.६१
डिचोली.......९,२२२........३२.८७
सांगे............१,६५६........२३.०८
तिसवाडी......१६,६२८......१९.८८
बार्देश.......२१,६०४........१८.५४
सासष्टी........२४,७७९.......१७.९३
पेडणे.........१२,४५१......१०.०७
केपे.............७,५३०..........८.२५
मुरगाव.........१०,८७२.......५.२३
सत्तरी............४,४९७........४.०५
काणकोण........४,२११.......३.३४
‍धारबांदोडा.........१,६९६.......२.१७                

हेही वाचा