भोम-फोंडा येथील ‘युवा एकवट’चे ‘रंगखेव’ प्रथम

कला अकादमीची कोकणी नाट्यस्पर्धा : संघर्ष वळवईकर, शेफाली नाईक उत्कृष्ट अभिनय

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
29th March, 12:31 am
भोम-फोंडा येथील ‘युवा एकवट’चे ‘रंगखेव’ प्रथम

प्रथम पारितोषिक विजेता ‘रंगखेव’ या नाटकातील एक प्रसंग.

पणजी : कला अकादमीने आयोजित केलेल्या ४८व्या कोकणी नाट्यस्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला असून युवा एकवट, भोमा-फोंडा यांनी सादर केलेल्या ‘रंगखेव’ या नाटकाला प्रथम पारितोषिक प्राप्त झाले आहे. सियावर राम, पिळगाव-डिचोली यांच्या ‘तो आनी दोन पिशें’ या नाट्यप्रयोगास द्वितीय, तर श्री सातेरी कला मंच, मोर्ले-सत्तरी यांच्या ‘निमणो पेलो’ या नाटकाची तृतीय पारितोषिकासाठी निवड करण्यात आली आहे. उत्तेजनार्थ पारितोषिके रसरंग, उगवे-पेडणे यांच्या ‘हयवदन’ व नटरंग किएशन्स नार्वे-डिचोली यांच्या ‘द ट्रॅप’ या नाटकाने पटकावली.
पुरुष गटात वैयक्तिक अभिनयासाठी संघर्ष वळवईकर यांना ‘तो आनी दोन पिशे’ नाटकातील ‘पिर’ या भूमिकेसाठी प्रथम पारितोषिक देण्यात आले असून ‌द्वितीय पारितोषिक सौरभ कारखानीस यांना ‘निमणो पेलो’ नाटकातील (मार्टिन) भूमिकेसाठी प्राप्त झाले. अभिनयासाठीची प्रशस्तिपत्रे सत्यजीत मुळी (म्हालबाप्पा) ‘काळमाया’, रघुनाथ साकोर्डेकार (प्रि. काळे) ‘कर्मभोग’, मयुर मयेकर (कपिल) ‘हयवदन’, मिलिंद बर्वे (श्रीधर कुलकर्णी) ‘द ट्रॅप’, वैभव कवळेकर (नील) ‘रंगखेव’, कन्हैया नाईक (बिरसा मुंडा) ‘मुळवंस’ व आशिष दामोदर गावस (देवचार) ‘धनया देवचारा’ यांना प्राप्त झाली.
स्त्री गटात वैयक्तिक अभिनयासाठी शेफाली नाईक यांना ‘रंगखेव’ नाटकातील (सायली) भूमिकेसाठी प्रथम पारितोषिक जाहीर करण्यात आले असून समिक्षा देसाई यांनी ‘हयवदन’ नाटकातील (पद्मिनी) भूमिकेसाठी द्वितीय पारितोषिक मिळाले. स्त्री गटात अभिनयासाठीची प्रशस्तिपत्रे वैष्णयी पै काकोडे (ज्योती प्रभुदेसाय) ‘कन्यादान’, सोबिता कुडतरकर (अपुरबाय) ‘तीन पैशाचो तियात’, ममता पार्सेकर (मॅरी) ‘निमणो पेलो’, वेदिका वाळके (अना) ‘निमणो पेलो’, रविना शेट (माणिक) ‘कासांळी आनी घोसाळी’, लक्ष्मी सातोर्डेकर (बायल) ‘सगळी रात’ व हर्षला पाटील (समिक्षा) ‘द बर्थ ऑफ डेथ’ यांना प्राप्त झाली.
उत्कृष्ट नेपथ्यासाठीचे पारितोषिक राजन नाईक यांना ‘रंगखेव’ नाटकासाठी प्राप्त झाले असून शाम शेट गावकर यांना ‘द ट्रॅप’नाटकासाठी प्रशस्तिपत्रक देण्यात आले आहे. ‘निमणो पेलो’ या नाटकाच्या वेशभूषेसाठी अलिशा मिनेझिस यांनी पारितोषिक मिळविले, तर प्रशस्तिपत्र ‘मूळवंस’ नाटकासाठी समिक्षा सावंत यांना देण्यात आले. प्रकाश योजनेसाठीचे बक्षीस अश्वेश गिमोणकर यांना ‘तो आनी दोन पिशे’ नाटकासाठी प्राप्त झाले असून प्रशस्तिपत्र नीलेश महाले यांना ‘हयवदन’ नाटकासाठी देण्यात आले. रंगभूषेचे पारितोषिक हर्ष नाईक यांनी ‘निमणो पेलो’ या नाटकासाठी प्राप्त केले असून अमिता नायक यांना ‘हयवदन’ या नाटकासाठी प्रशस्तिपत्र देण्यात आले. उत्कृष्ट पार्श्वसंगीताचे पारितोषिक अकार नागेशकर यांनी ‘तो आनी दोन पिशे’ या नाटकासाठी संपादन केले. तर दीप्तेज नाईक यांना ‘रंगखेव’ नाटकासाठी प्रशस्तिपत्र देण्यात आले.
नाट्यलेखनासाठी प्रथम पारितोषिक दीपराज सातोर्डेकर याना ‘द बर्थ ऑफ डेथ’ नाटकासाठी देण्यात आले असून दशरथ मांद्रेकर यांना 'म्हादय' नाटकासाठी द्वितीय पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे. खास स्पर्धेसाठी अनुवादित-रूपांतरित-आधारित नाट्यसंहिता लेखनाचे पारितोषिक वैभव कवळेकर यांच्या 'रंगखेव' या नाट्यसंहितेस देण्यात आले.
स्पर्धेसाठी २३ नाटकांचे सादरीकरण
या स्पर्धेसाठी एकूण ३९ प्रवेशिका विविध संस्थांकडून आल्या होत्या त्यातून २३ नाटके सादर झाली. या स्पर्धेचे परीक्षण मुकेश थळी, व्यंकटेश नाईक व संतोष शेटकर या परीक्षकांनी केले. पारितोषिकप्राप्त कलाकारांचे कला अकादमीच्या वतीने अभिनंदन करण्यात आले असून या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाची तारीख मागाहून जाहीर करण्यात येईल, याची नाट्यप्रेमी रसिकांनी व स्पर्धकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन कला अकादमीतर्फे करण्यात आले आहे.
शेफाली नाईक उत्कृष्ट दिग्दर्शक
उत्कृष्ट दिग्दर्शनाचे प्रथम पारितोषिक शेफाली संदीप नाईक यांना ‘रंगखेव’ या नाटकासाठी देण्यात आले असून अश्वेश गिमोणकर यांनी ‘तो आनी दोन पिशे’ नाटकासाठी द्वितीय पारितोषिक संपादन केले. तर तृतीय पारितोषिक ‘निमणो पेलो’ नाटकासाठी वैभव नाईक यांना देण्यात आले.                   

हेही वाचा