ताळगाव पंचायतीच्या सात प्रभागांसाठी ६८.७९ टक्के मतदान

आज होणार मतमोजणी; बाबूश समर्थक चार उमेदवार बिनविरोध

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
28th April, 10:24 pm
ताळगाव पंचायतीच्या सात प्रभागांसाठी ६८.७९ टक्के मतदान

मतदान केंद्राबाहेर रांगेत उभे असलेले मतदार. (नारायण पिसुर्लेकर)
पणजी : ताळगाव पंचायतीच्या सात प्रभागांसाठी रविवारी ६८.७९ टक्के मतदान झाले. अकरापैकी चार प्रभागांतील उमेदवारांची अगोदरच बिनविरोध निवड झाली होती. त्यामुळे सात प्रभागांसाठी मतदान घेण्यात आले. सोमवारी मतमोजणी होणार आहे.
प्रभाग एक, सहा, दहा आणि अकरामधील उमेदवारांची अगोदरच बिनविरोध निवड झाली आहे. उर्वरित सात प्रभागांमध्ये एकूण १४ उमेदवार रिंगणात होते. यावेळी ताळगाव पंचायतीच्या निवडणुकीत मंत्री तथा पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांच्या पॅनल​विरोधात इंडी आघाडीच्या घटक पक्षांनी एकत्र येत उमेदवार दिले होते. त्यामुळे पंचायत निवडणूक चुरशीची होईल, असा अंदाज होता. परंतु, बाबूश पॅनलचे प्रभाग एकमधील उमेदवार सिद्धी केरकर, प्रभाग सहामधील एस्टेला डिसोझा, प्रभाग दहामधील सागर बांदेकर आणि अकरामधील सिडनी पॉल बार्रेटो यांची बिनविरोध निवड झाल्याने पंचायतीवर पुन्हा बाबूश गटाचीच सत्ता स्थापन होण्याची शक्यता आहे. मंत्री बाबूश मोन्सेरात, आमदार जेनिफर मोन्सेरात यांनीही मतदानाचा हक्क बजावला.
बाबूश-सिसिलमध्ये बाचाबाची
ताळगाव पंचायत निवडणूक पारदर्शक पद्धतीने व्हावी यासाठी आपण प्रयत्न करू, असे म्हणणाऱ्या मंत्री बाबू​श मोन्सेरात यांचे समर्थक मतदान केंद्रांवर जाऊन मतदारांना आमिषे दाखवत आहेत. मतदान प्रक्रियेत अडथळे आणण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप ‘आप’च्या नेत्या सिसिल रॉड्रिग्स यांनी केला. यावरून त्यांच्यात आणि मंत्री मोन्सेरात यांच्यात बाचाबाचीही झाली. त्यावेळी संशय असल्यास मामलेदारांकडे तक्रार करा. ते योग्य ती कारवाई करतील, असेही मोन्सेरात यांनी सिसिल यांना सांगितले.


हेही वाचा