हैदराबादचा चौकार, षटकारांचा पाऊस

आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक धावसंख्या : चॅम्पियन मुंबईचा ३१ धावांनी पराभव

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
28th March, 12:37 am
हैदराबादचा चौकार, षटकारांचा पाऊस

हैदराबाद : आयपीएल २०२४ च्या ८ व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने मुंबई इंडियन्सचा ३१ धावांनी पराभव केला. या सामन्यात हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ३ गडी गमावून २७७ धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबईचा संघ २० षटकांत ५ बाद २४६ ​​धावाच करू शकला. तिलक वर्माने (६४) मुंबईला ‌जिंकून देण्यासाठी बराच प्रयत्न केला. पण, संघाला विजयाची सीमा ओलांडता आली नाही.
मुंबईची चांगली सुरुवात
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या असलेल्या २७८ धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या मुंबई संघाची चांगली सुरुवात झाली. रोहित शर्मा आणि इशान किशन यांनी पहिल्या विकेटसाठी ५६ (२० चेंडू) धावांची भागीदारी केली. पण, त्याचा पहिला धक्का चौथ्या षटकात इशानच्या रूपाने बसला, जो १३ चेंडूंत २ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ३४ धावा काढून बाद झाला. त्यानंतर मुंबईने रोहित शर्माच्या (२६) रूपाने दुसरी विकेट गमावली. त्यानंतर तिलक वर्मा आणि नमन धीर यांनी तिसऱ्या विकेटसाठी ८४ धावांची भागीदारी केल्याने चाहत्यांच्या आशा पुन्हा एकदा उंचावल्या. पण ही भागीदारी ११ व्या षटकात बाद झालेल्या नमन धीरच्या (३०) विकेटने संपुष्टात आली.
त्यानंतर तिलक वर्मा (६४) पॅव्हेलियनमध्ये परतला, त्याने २ चौकार आणि ३ षटकार लगावले. १८व्या षटकात कर्णधार हार्दिक पांड्याच्या रूपाने संघाला पाचवा धक्का बसला. पंड्याने २४ धावा केल्या. बाद होण्यापूर्वी हार्दिकने टीम डेव्हिडसोबत पाचव्या विकेटसाठी ४२ धावांची भागीदारी केली होती. मात्र, ते संघाला विजय मिळवूून देऊ शकले नाही.
तत्पूर्वी ट्रेविस हेड, अभिषेक शर्मा, हेनरिक क्लासेन आणि एडन मार्करम यांच्या वादळी फलंदाजीच्या जोरावर हैदराबादने निर्धारित २० षटकांमध्ये २७७ धावांचा डोंगर उभारला. हैदराबादच्या स्फोटक फलंदाजीसमोर मुंबईच्या एकाही गोलंदाजाची डाळ शिजली नाही. बुमराह, हार्दिक, कोइत्जे, पियूष चावला यांसारखे दिग्गज गोलंदाज फेल गेले. ट्रेविस हेड (६२), अभिषेक शर्मा (६३), हेनरिक क्लासेन (नाबाद ८०) आणि एडन मार्करम (नाबाद ४२) यांनी धावांचा पाऊस पाडला. मुंबईकडून एकाही गोलंदाजाला लौकिकास साजेशी गोलंदाजी करता आली नाही.
हार्दिक पंड्या याने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. ट्रॅव्हिस हेड आणि मयंक अग्रवाल मैदानात उतरले होते. मयंकने सावध सुरुवात केली होती. मात्र, हेड वेगळ्याच फॉर्ममध्ये होता. त्याने पहिल्या चेंडूपासून मुंबईवर आक्रमण चढवले होते. हार्दिक पंड्याच्या पहिल्याच षटकात मिळालेल्या जीवदानाचा त्याने चांगला फायदा घेतला.

ट्रेविस हेडची वादळी सुरुवात
ट्रेविस हेडने पहिल्या चेंडूपासूनच मुंबईच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. मयांक अग्रवाल फक्त ११ धावा काढून बाद झाला. पण, त्यानंतर हैदराबादच्या धावसंख्येची गाडी वेगाने पळाली. हेडने १८ चेंडूमध्ये अर्धशतक ठोकले. त्याने चौफेर फटकेबाजी केली. हेडला कोइत्जेने तंबूत पाठवले. तोपर्यंत हेडने २४ चेंडूत ६२ धावांचा पाऊस पाडला. या खेळीमध्ये हेडने तीन षटकार आणि ९ चौकार लगावला. हेडला पाच धावांवर जीवनदान मिळाले होते, त्याचा फायदा त्याने घेतला. ट्रेविस हेडने मयांक अग्रवाल याच्यासोबत ४५ तर अभिषेक शर्मासोबत ६८ धावांची भागिदारी केली.
अभिषेक शर्माचा झंझावत
युवा अभिषेक शर्मा याने हैदराबादच्या मैदानात षटकारांचा पाऊस पाडला. अभिषेक शर्माने प्रत्येक गोलंदाजाचा समाचार घेतला. अभिषेकने अवघ्या १६ चेंडूमध्ये अर्धशतक ठोकले. अभिषेक शर्मापुढे मुंबईची गोलंदाजी दुबळी वाटली. अभिषेकने २३ चेंडूमध्ये ६३ धावांचा पाऊस पाडला. या खेळीमध्ये त्याने ७ षटकार आणि ३ चौकार लगावले. अभिषेक शर्माने ट्रेविस हेड सोबत ६८ धावांची भागिदारी केली. तर मार्करमसोबत ४८ धावा जोडल्या.

क्लासेनचे वादळ
कोलकात्याविरोधात जिथे खेळ थांबवला, तिथेच हेनरिक क्लासेनने खेळाला सुरुवात केली. क्लासेनने प्रत्येक चेंडूवर चौफेर फटकेबाजी केली. त्याने मुंबईच्या प्रत्येक गोलंदाजाचा खरपूस समाचार घेतला. क्लासेन आणि मार्करम यांच्यामध्ये ५५ चेंडूमध्ये ११६ धावांची नाबाद भागिदारी झाली. यामध्ये क्लासेनचे योगदान ३४ चेंडूमध्ये ८० धावांचे राहिले. हेनरिक क्लासेनने २३५ च्या स्ट्राईक रेटने फटकेबाजी केली. क्लासेनने ३४ चेंडूमध्ये ८० धावा केल्या. या खेळीत दरम्यान त्याने ७ षटकार आणि ४ चौकार मारले.
मार्करमची संयमी खेळी
एडन मार्करमने एका बाजूला संयमी फलंदाजी करत धावसंख्या हालती ठेवली. मार्करमने आधी अभिषेक शर्माला साथ दिली, नंतर क्लासेनसोबत मोठी भागिदारी केली. एडन मार्करमने २८ चेंडूमध्ये ४२ धावांचे योगदान दिले. यामध्ये एक षटकार आणि दोन चौकारांचा समावेश होता.
मुंबईची गोलंदाजी फोडली
हैदराबादच्या फलंदाजांनी मुंबईची गोलंदाजी फोडून काढली. मुंबईकडून एकाही गोलंदाजाला भेदक मारा करता आला नाही. बुमराह, हार्दिक, कोइत्जे, पियूष चावला सगळेच फेल गेले. हार्दिक पांड्या, कोइत्जे आणि पियुष चावला यांनी प्र्तेयकी एक एक विकेट घेतली.
.......
संभाव्य धावफलक
हैदराबाद : २० षटकांत ३ बाद २७७ धावा
मुंबई : २० षटकांत ५ बाद २४६ धावा
सामनावीर : हेनरिक क्लासेन

आयपीएलमधील सर्वोच्च धावसंख्या
धावा- संघ- विरुद्ध संघ- वर्ष
२७७ - सनराईज हैदराबाद - मुंबई इंडियन - २०२४
२६३ - आरसीबी - पुणे वॉरियर्स - २०१३
२५७ - लखनऊ सुपर जायंट्स - पंजाब किंग्स - २०२३
२४८ - आरसीबी - गुजरात लायन्स - २०१६
२४६ - चेन्नई - राजस्थान रायल्स - २०१०