उजवीकडून डावीकडे वळलेला लेखक

झापडबंद जगून कट्टर धर्म संस्कारातून आपण अधिक कडवट होत जातो. पण उत्तम वाचनातून या सगळ्यापासून परावृत्त होत समाज सर्वार्थाने एकसंध राहावा म्हणूनही प्रयत्न करत असतो - आपल्याबरोबर इतरांचेही जगणे सलोख्याने समृद्ध करत जातो. नितीन साळुंखे यांनी संघाच्या धर्मनिष्ठ संस्कारातून बाहेर पडून समाजाला हाच तर संदेश दिलेला आहे!

Story: वर्तमान |
26th March, 10:27 pm
उजवीकडून डावीकडे वळलेला लेखक

त्यांच्यावर लहानपणापासून संघाचे संस्कार झाले. पुढे तरुणपणी मित्रमंडळीही त्याच विचाराची. चाळीशीपर्यंत नोकरी करताना नोकरीतील सहकारी संघाशी संबंधित. पुढे हिंदुत्ववादाशी निष्ठा दाखवणाऱ्या पक्षाशी संबंधित कार्यरत. मात्र धर्माशी कट्टर अशा संस्कारात वाढलेला माणूसही पुढे वाचनाच्या संस्कारातून जात, धर्म नाकारून फक्त माणूस म्हणूनच कसा जगू पाहतो आणि लेखकही कसा बनू शकतो, याचे उत्तम उदाहरण म्हणून मनोविकास प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या आणि बहुचर्चित ठरलेल्या 'अज्ञात मुंबई' या ग्रंथाचे सुप्रसिद्ध लेखक नितीन साळुंखे यांच्याबाबत सांगता येईल. अनेक मराठीतील लेखक संघाशी आतून निष्ठा जपून असतात. ती त्यांनी जपावीही. ते त्यांचे स्वातंत्र्य आहे. मात्र दुसऱ्या बाजूला आपण कसे पुरोगामी आहोत, असा टेंभाही ते मिरवतात. प्रसंगी संघाच्या सर्व सांस्कृतिक मंचावर जाऊन दुटप्पी वागतात. परंतु नितीन साळुंखे हे जाहीरपणे माझ्यावर संघाचे संस्कार झाले असे सांगतानाच "संघापासून आता अंतर ठेवूनच राहायला हवे" अशी स्पष्ट भूमिका घेतात. तेव्हा त्यांच्या या स्पष्टपणाचे कौतुक करावे तेवढे थोडेच! 

साळुंखे हे मूळचे तळकोकणातील. त्यांना वाटले नव्हते की, भविष्यात आपण कधी संघाच्या संस्काराची उलट तपासणी करू आणि स्वतःचीच स्वतः चिकित्साही करू. ते म्हणतात, संघाच्या विचाराच्या प्रभावामुळे आजवर मी झापडबंद जगणे जगत आलो. पण माझ्यातील डोळस वाचनातून बाहेर सहजपणे न दिसणारा, पण आतून जाणवणारा जाती-धर्मद्वेष अधिक ठळकपणे माझ्यासमोर येऊ लागला. उदा. मुसलमान आणि चार लग्न. लहानपणापासून ती गोष्ट नकळत कानावर पडत होती. माझीही तीच समजूत होती. पण संघाच्या संस्काराच्या कोषातून मी बाहेर आल्यावर माझ्या लक्षात आले की, माझ्या अनेक मुसलमान मित्रांपैकी एकानेही चार लग्न केलेली नाहीत. मग असे का सांगितले जाते, याची उत्तरे मला वाचनातून सापडू लागली. मी मुळात डावाच होतो. फक्त ते मला वयाच्या पन्नाशीत उमगले एवढेच! मला माझी ओळख करून देण्याचे श्रेय कुणाचे असेल तर ते नरहर कुरुंदकर यांचे आहे. या माणसाने माझ्या विचारावर साचलेले शेवाळ खरवडून काढले आणि मला मोकळे केले. पुढे आ. ह. साळुंखे, नंदा खरे यांच्या लेखनाच्या वाचनातून या जगातील सर्व जाती धर्मातील माणूस एकच आहे, याची तीव्रतेने जाणीव झाली आणि मी आमूलाग्र बदललो. एकत्र नोकरी करणाऱ्या मित्रासोबत नोकरीचा राजीनामा देऊन  आपल्या या मित्रासोबत कोकणातील राजकारणात प्रवेश केला. माझा हा मित्र पुढे आमदारही झाला. या संदर्भात सांगताना साळुंखे म्हणतात, या सहा-सात वर्षांच्या काळात सर्वपक्षीय राजकारणाचे जे स्वरूप जवळून पाहायला मिळाले त्याने एक गोष्ट माझ्या मनात आली की, राजकारणात तत्व-विचार-निष्ठा-प्रामाणिकपणा हे फक्त बोलण्यासाठी असतात.

त्यातून राजकारणाविषयी माझ्या मनात तिटकारा निर्माण झाला. पुढे वाचनातून विचार करण्याची सवय लागली आणि त्यातून लेखन करण्यास प्रारंभ केला. 'दैनिक एकमत’मधील माणसाच्या दुटप्पी वागण्यावरील ‘मन कि बात’ हे त्यांनी लिहिलेले स्तंभलेखन खूपच बहुचर्चित झाले. प्रथा, परंपरा, रुढी, सण, दैवते, समजुती यांचे स्वरूप उलगडून सांगण्यात त्यांना रस वाटू लागला. त्या संदर्भातले वाचन सुरू झाले. त्यातून साळुंखे यांचा नास्तिकतेकडे प्रवास सुरू झाला.

पुढे त्यांनी ‘अज्ञात मुंबई’ हे पहिले पुस्तक लिहिले. ते प्रसिद्ध होताच सहा महिन्यातच पहिली आवृत्ती संपली. त्यातून त्यांचा लेखनाचा हुरूप वाढला. साळुंखे म्हणतात, देशाची लक्ष्मी असलेली मुबई कुणा राजकारण्याने किंवा उद्योगपतीने घडवलेली नाही. ती घडवलेली आहे इथल्या श्रमकरी जनतेने. त्यात सर्व जाती-धर्म-पंथ आणि भाषिकांचा समान वाटा आहे. इथे केवळ श्रमाला प्रतिष्ठा आहे. कुणाची जात-धर्म विचारून इथे काम दिले जात नाही. आता दिवस बदलतायत, पण तरीही मुंबईचा जात-धर्म-भाषा सलोखा अजून बऱ्यापैकी टिकून आहे. म्हणून तर देशभरातले लोक मुंबईत राबायला येत असतात. इथल्या संस्था तुम्ही इतरत्र घेऊन जाल, पण इथल्या लोकांमध्ये असलेल्या सलोख्याच्या जाणिवा कशा घेऊन जाल. शहराची ओळख तिथल्या सामान्य लोकांमुळे असते; श्रीमंत लोक आणि संस्थांमुळे नाही. मुंबई ही अशीच सामान्य लोकांनी घडवलेली आणि टिकवून ठेवलेली आहे. संपूर्ण मुंबई शहर हेच एक संग्रहालय आहे. इथल्या रस्त्यावरून चालताना सहज म्हणून पायाने उडालेला एक क्षुल्लक खडाही उरात काहीतरी इतिहास बाळगून आहे. मला तो इतिहास सांगायचा आहे. माझं ‘अज्ञात मुंबई-२’ हे पुस्तक लिहून तयार आहे. या वर्षी प्रकाशित होईल.'मुंबई गिरणी कोष' हा ग्रंथ मनोविकासतर्फे - पुढील वर्षात २०२५-२६ मध्ये प्रकाशित होईल. या विषयावर मराठी भाषेत असलेले हे एकमेव पुस्तक ठरेल. 

साळुंखे यांचा एक कर्मचारी ते राजकीय कार्यकर्ता ते लेखक हा सारा प्रवास समजून घेणे इथे एवढ्यासाठीच महत्वाचे आहे की, झापडबंद जगून कट्टर धर्म संस्कारातून आपण अधिक कडवट होत जातो. त्यातून आपल्या आजूबाजूच्या समाजाचा चेहराही विद्रूप करण्याचा प्रयत्न आपण करतो. पण उत्तम वाचनातून या सगळ्यांपासून परावृत्त होत समाज सर्वार्थाने एकसंध राहावा म्हणूनही प्रयत्न करत असतो - आपल्याबरोबर इतरांचेही जगणे सलोख्याने समृद्ध करत जातो. नितीन साळुंखे यांनी संघाच्या धर्मनिष्ठ संस्कारातून बाहेर पडून समाजाला हाच तर संदेश दिलेला आहे!

अजय कांडर

लेखक विख्यात कवी, व्यासंगी 

पत्रकार आहेत. (मो. क्र. ९४०४३९५१५५)