फाल्गुन उत्साहाचा मधुमास

शिमग्याचा उत्सव गोवाभर फाल्गुन महिन्यात विविध तऱ्हेने उत्स्फूर्त साजरा करण्याची जी परंपरा आहे, तिचे प्रदेशानुसार दर्शन घडते. वर्षाचा निरोप घेऊन कष्टकरी फाल्गुनातल्या शिमगोत्सवाद्वारे चैत्र महिन्याच्या आणि वर्षारंभाच्या तयारीला लागतात आणि त्यामुळेच फाल्गुन हा उत्सव आणि उत्साहाचा मास म्हणून प्रामुख्याने गणला आहे.

Story: विचारचक्र |
26th March, 10:21 pm
फाल्गुन उत्साहाचा मधुमास

चांद्र कालगणनेनु‌सार वर्षातल्या शेवटच्या फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेपासूनच नव्हे तर एकंदर हा संपूर्ण महिना नृत्य, नाट्य, गायन, वादन आदी लोककलांच्या उत्स्फूर्त आविष्काराशी निगडित आहे आणि त्यामुळे रंगोत्सव, धुलीवंदन, होळी नावांनी तो साजरा केला जातो. भारत हा उष्णकटिबंध प्रदेशातला देश म्हणून परिचित असून, गोवा-कोकणात उन्हाळ्यात उष्णतेचा पारा सातत्याने वाढता असतो आणि त्यामुळे असह्यकारक उकाड्याला सामोरे जाण्यासाठी आप‌ल्याकडे लोकनृत्यांचे प्रयोजन फाल्गुनात केलेले पहायला मिळते आणि त्यातून कष्टकरी जाती जमातींचा उत्साह दृष्टीस पडतो.

माघ महिन्यात जेव्हा महाशिवरात्रीचा उत्सव साजरा केला जातो, तेव्हाच खरेतर शिमगोत्सवाची कष्टकरी लोकमनाला चाहुल लागते. ढोलावर काठी मारल्यावर कष्टकऱ्यांच्या हातापायांत ताल, नाद, लयाचा संचार होतो आणि पारंपरिक मांडावर ठरलेल्या तिथीला सामूहिकरित्या वादन, गायन आणि नर्तन करण्यासाठी सज्ज होतात. काणकोण, सांगेतील जंगलात, माळरानांवर एकेकाळी आदिवासी वेळिप समाजाचे वास्तव्य होते. जंगलनिवासी वेळिप-गावकर निसर्गपूजक असून त्यांच्याकडे शिवाची पूजा विविध रूपांत केली जाते. आज नोकरी, उद्योग-धंद्याखातर वेळिप समाज डोंगरांच्या पायथ्याशी वसलेल्या गावांकडे वळले. परंतु असे असले तरी महाशिवरात्रीनंतर त्यांची पावले दरवर्षी निसर्गाच्या सान्निध्यात पूर्वाश्रमीच्या जागेत शिमगोत्सव साजरा करण्यासाठी वळतात. वृक्षांच्या सान्निध्यात असलेल्या मांडावर तोणयामेळ लोकनृत्यांचा सराव रात्री घुमट, समेळ आणि कासाळ्यांच्या तालावर केला जातो आणि त्यानंतर लोकनृत्याचा आविष्कार सादर करण्यासाठी लोकनर्तक गावोगावी मेळ घेऊन जाण्यास सिद्ध होतात आणि त्यांचे घरोघरी परंपरेने स्वागत केले जाते.

शिमग्याचा उत्सव गोवाभर फाल्गुन महिन्यात विविध तऱ्हेने उत्स्फूर्त साजरा करण्याची जी परंपरा आहे, तिचे प्रदेशानुसार दर्शन घडते. वर्षाचा निरोप घेऊन कष्टकरी फाल्गुनातल्या शिमगोत्सवाद्वारे चैत्र महिन्याच्या आणि वर्षारंभाच्या तयारीला लागतात आणि त्यामुळेच फाल्गुन हा उत्सव आणि उत्साहाचा मास म्हणून प्रामुख्याने गणला आहे. फाल्गुन महिन्यात शिमग्याच्या कालखंडात चोरोत्सव, गडोत्सव, घोडेमोडणी, करवल्यो अशा उत्सवांची रेलचेल असून वर्षभर कष्टाच्या कामात गुंतलेल्या हातापायांत असलेला लय, ताल, नाद यांचे दर्शन घडवण्यासाठी फाल्गुनात या लोकोत्सवाचे प्रयोजन केलेले आहे, ही महत्त्वाची बाब आहे.

सांगे, केपे, धारबांदोडा, काणकोणात प्रामुख्याने वास्तव्यास असणाऱ्या वेळिप-गावकर समाजाच्या शिमग्यास खरेतर महाशिवरात्रीला जरी प्रारंभ होत असला तरी, त्या उत्साहाला उधाण येते ते फाल्गुन नव‌मीपासून चतुर्दशीपर्यंत. परंपरेने ठरलेल्या मार्गांनी शिमग्याचे मेळ गावोगावी जातात आणि चतुर्दशीला समूहिकरित्या एकत्र येऊन रामायण, महाभारत आणि अन्य धार्मिक, सांस्कृतिक काव्यावर आधारित लोकगीतांच्या पार्श्वगायनावर आणि घुमट, समेळ, कासाळे आदी लोकवाद्यांवर तालगडी, तोणयामेळ लोकनृत्यांचे सादरीकरण करतात. 

पाताळ खंडा राज्या, चंदन मुगडो सुटला।

तसो परवतासित रे चंदन फुलला॥

तसो चंदन फुलला चंदन कोणी देखिला।

तसो चंदनाचे परमळ वयते देवा देवलोका॥

शिमग्याच्या लोकगीतांतून चंदन, औदुंबर, आंबा, बकुळ अशा वृक्षांचा संदर्भ येतो आणि त्यातून निसर्ग आणि पर्यावरण यांच्याशी असलेल्या अनुबंधाचे दर्शन घडते. सह्याद्रीच्या पर्वतमाथ्यावर, पठारावर वास्तव्यास असलेले हे कष्टकरी शेताभाटात, डोंगरउतारावर मेहनत करून धान्यांची पैदासी करतात आणि शिमग्याच्या कालखंडात धरती, गायत्री आणि लोकदैवतांविषयी आपल्या हृदयातील कृतज्ञता, आदरभाव व्यक्त करतात. सत्तरीत होळी पौर्णिमेनंतर करवल्यो, घोडेमोडणी, रोमटामेळाला प्रारंभ होतो. करवल्यांच्या उत्सवावेळी जी लोकगीते गायिली जातात, त्यांना सकारती म्हणतात. अशा लोकगीतांतून कधीकाळी पतीच्या मृत्यूनंतर त्याच्या सरणात उडी घेऊन मृत्युमुखी पडलेल्या स्त्रीला सती म्हणतात आणि त्याच्या स्मरणार्थ जी लोकगीते ढोल, तासा, कासाळे आदी वाद्यांच्या संगीतावर गायिली जातात, ती सकारतीच्या माध्यमातून ओळखली जातात.

आदी रचला आकार। मगे रचली गायतरी।।

मगे रचली धरतरी। गायतरी शेणान धरतरी।।

शिमग्याच्या करवल्यांच्या उत्सवावेळी जी लोकगीते गायिली जातात, ती सकारती, तर अन्य गीतांना जती ही सज्ञा रूढ आहे. सत्तरीतील वांते गावातील पारंपरिक लोकगीतातून जैविक संपदे्चया घटकांचे संदर्भ आढळतात.

ताल्ली व्हकल, बांगडो नवरो

शेवटो जालो धेडो।।

हुडोन शेवटो दिवटी धरी, कुल्ली वाजाप करी।

पिटकोळीण म्हणी आपूण भाविण

तिळो लाईन रे खेळ्या....

सत्तरी, डिचोली आणि त्यांच्याशी संलग्न असणाऱ्या सीमेवरच्या गावांत करवल्यांच्या उत्सवात ज्या सकारती म्हटल्या जातात त्याद्वारे परिसरातल्या सामाजिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणीय संचितांचे दर्शन घडत असते. लोकां‌शी निगडित नानाविविध परंपरांचे पालन कष्टकरी समाजाने केलेले असून, त्यातून त्यांच्या भावविश्वाचा आविष्कार अनुभवायला मिळलो. अंत्रुज महालातल्या शिमगोत्सवात जी लोकगीते घुमट, कासाळे, समेळ आदी लोकवाद्यांच्या पार्श्वसंगीतावर सादर केली जातात, त्यातून काही वेळा तेथील देवदेवतांचा उल्लेख आढळतो. शिरोडा गावातील देवी कामाक्षी ही सासष्टीतील राय गावातली. पोर्तुगीज राजवटील धार्मिक छळवादाच्या काळात कामाक्षी शिरोडा येथे आली आणि ती इथल्या लोकसंस्कृतीशी एकात्म झाली आणि त्यामुळे आज शिमग्यातील लोकगीतांत तिचा उल्लेख आढळतो. 

असे गावांमधे गाव एक शिरोडे गाव बा।

असे देवांम‌धे देव एक कामाक्षी देवी बा।

असे त्या देवळाचे चंदनाचे खामे बा।

शिमग्याच्या लोकगीतांतून जसे देवदेवतांचे उल्लेख आढळतात त्याचप्रमाणे या सृष्टीची निर्मिती कथाही मांडली जाते. अशाच स्वरूपाचे एक भावस्पर्शी लोकगीत अंत्रुज महालात रूढ आहे.

भाव ना भगत शिवनाथ सात निरंजळा कोण जल्मला

ब्रस्मा विष्णू महेश रे जल्मला

ब्रह्मा हाती कुदळ, विष्णू हाती पाटली

भरून भूमी पृथ्वीची माती

चारी खंड सारखेच केले

तेथे नारळी पोफळी अनंत कोटी

सृष्टीचा शृंगार केला....

पेडणे ते काणकोणपर्यंत गोव्यात शिमगोत्सवातील नानाविविध लोकगीतांतून, लोकनृत्यांतून आणि परंपरांतून त्यांच्या दैनं‌दिन जीवनातील पैलूंचे, धर्मश्रद्धेचे आणि एकंदर भावविश्वाचे दर्शन घडते. काणकोणातील श्रीस्थळ, गावडोंगरीतील श्रीस्थळ आणि खोतीगावातील अवे येथे संपन्न होणारा शिशारान्नीचा विधी असो अथवा सत्तरीतील झर्मे आणि करंझोळ येथील आगळावेगळा चोरोत्सव याद्वारे पूर्वाश्रमीच्या इतिहास आणि संस्कृतीचे दर्शन जसे घडते, तसेच त्यांच्याशी संबंधित रितीरिवाज, लोकपरंपरा यामागे असलेल्या लोकश्रद्धा अनुभवायला मिळतात. चांद्र कालगणनेतील शेवटचा महिना फाल्गुन लोकसंस्कृतीच्या विविधांगी पैलूचे दर्शन घडवत कधी सरतो याची कल्पना करता करता, आकस्मि‌कपणे चैत्रातला शुभारंभ गुढीपाडव्याने केला जातो. त्यामुळे गोमंतकीय लोकमानसासाठी फाल्गुन मास, उल्हासाचा अपूर्व मधुमास ठरलेला आहे.

प्रा. राजेंद्र केरकर

(लेखक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते 

असून पर्यावरणप्रेमी आहेत.)

मो. ९४२१२४८५४५