भाजपची उमेदवार निवड

भाजप आपल्या ध्येय धोरणांचा पुरस्कार करणाऱ्यांचीच दखल घेते. आतापर्यंत सुमारे ४०२ उमेदवार जाहीर केले आहेत. अनेक राज्यांमध्ये भाजपच्या मित्र पक्षांशी वाटाघाटी सुरू आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत त्या राज्यांमधील उमेदवारही निश्चित होतील.

Story: संपादकीय |
26th March, 12:32 am
भाजपची उमेदवार निवड

भाजपची सत्ता देशात आल्यापासून ज्या पद्धतीने काही हिंदुत्ववादी नेते, अभिनेत्यांना वेगवेगळे पुरस्कार आणि पदे दिली जात आहेत, तीच पद्धत भाजपने आता लोकसभेच्या निवडणुकीतही अवलंबली आहे, असेच साधारणतः भाजपच्या उमेदवारांची यादी पाहिल्यानंतर दिसते. आतापर्यंत जाहीर झालेल्या पाच यादीत काही आश्चर्याचे धक्के भाजप देत आहे. दुसऱ्या बाजूने अनेक चांगल्या प्रभावी विद्यमान मंत्र्यांना यादीतून वगळले जात आहे. काही खासदारांनाही उमेदवारीच्या यादीतून वगळले गेले. अजूनही काही ठिकाणचे उमेदवार जाहीर व्हायचे आहेत. एक स्पष्ट आहे ते म्हणजे, कुठल्याही बंडखोरीची भाजपला चिंता नाही. कारण भाजपशी शत्रुत्व घेणे हे अनेकांना आतापर्यंत जमलेले नाही. काही त्याला अपवाद आहेत. सोडून गेलेले काही नेते पुन्हा भाजपमध्ये आले, त्यांनाही भाजपने जाती पातीची समीकरणे पाहून उमेदवारी दिली आहे. भाजप सोडून ज्यांनी २०२३ मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता, ते आता पुन्हा भाजपात परतले आहेत. कर्नाटकाचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर आता भाजपच्या उमेदवारीवर बेळगावमधून निवडणूक लढतील. अनेक नेते, उद्योजक, अभिनेते आजही काँग्रेस किंवा अन्य पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश करत आहेत.

निवडणुकीच्या काळात भाजपची ताकद दिवसेंदिवस वाढत जात असल्याचेच सध्या दिसते. इलेक्टोरोल बाँडमधूनही सर्वाधिक लाभ भाजपलाच मिळाला आहे. आर्थिक असो किंवा भाजपमध्ये होणारा इतर पक्षातील नेत्यांचा प्रवेश असो, सगळ्याच बाजूंनी भाजप मजबूत होत चालली आहे. आता तर भाजपने कंगना रणावत यांनाही उमेदवारी जाहीर केली. पस्तीस वर्षांपूर्वी रामायण मालिकेतून जनमानसांवर प्रभू रामाच्या भूमिकेतून गारुड निर्माण केलेले अरुण गोविल यांना वयाच्या ७२ व्या वर्षी उमेदवारी दिली आहे. अयोध्येत श्री रामाचे मंदिर उभारल्यानंतर आणि तिथे मूर्ती स्थापन केल्यानंतर भाजपने रामाची भूमिका करणारे गोविल यांना त्यांचे भवितव्य मतपेटीतून आजमावण्यासाठी पुढे केले आहे. भाजपची भूमिका मांडून विरोधकांकडून कायम ट्रोल होणारे, पण पक्षाच्या भूमिकेप्रती निष्ठा दाखवणारे संबित पात्रा, पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस सरकारला बहुतांशवेळा फटकारणारे माजी न्यायमूर्ती अभिजीत गंगोपाध्याय, काँग्रेस सोडून आलेले उद्योगपती नवीन जिंदाल यांना भाजपाने उमेदवारी दिली. उत्तर कन्नडचे खासदार अनंतकुमार हेगडे यांनी राज्यघटनेविषयी वादग्रस्त विधान केल्यामुळे भाजपने त्यांना लोकसभेची उमेदवारी नाकारली. महिला कुस्तीपटूंच्या आरोपांमुळे वादात सापडलेले बृजभूषण शरण सिंह यांनाही अद्याप भाजपने उमेदवारी जाहीर केलेली नाही.

भाजपने ‘४०० पार’ नारा लावल्यामुळे जिंकण्याची क्षमता पाहूनच बहुतांश ठिकाणी उमेदवार देण्याचे प्रयत्न चालवले आहेत. ज्या ठिकाणी भाजपचा उमेदवार जिंकण्याची क्षमता नाही, असे अहवाल भाजपला अंतर्गत सर्वेमधून प्राप्त झाले आहेत. तिथे काही उद्योजक, महिला, चित्रपट तारे यांना उमेदवारी देऊन नवे डावही भाजप खेळत आहे. हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्यांना लोकसभेच्या उमेदवारीची खिरापत वाटली जात आहे. पण ही खिरापत वाटून भाजपला दिल्लीत सरकार चालवण्यासाठी कुशल प्रशासनाचा अनुभव असलेले खासदार मिळतील की पुन्हा गेल्या दोन कार्यकाळात जसे अनेकदा राज्यसभेवर काही लोकांना नेऊन मंत्रिपदे दिली गेली त्याची पुनरावृत्ती होणार आहे, तेही पहावे लागेल. २०१४ पासून आतापर्यंत भाजपला केंद्रात मंत्रिमंडळात सहभागी करण्यासाठी कुशल नेते मिळत नव्हते, त्यामुळे अनेकदा राज्यसभेवर काही नेत्यांना घेऊन केंद्रीय मंत्रिपदे देण्यात आली. लोकसभेवर निवडून येणाऱ्यांमध्ये मंत्रिपदांची क्षमता कमी दिसत असल्यामुळेच चांगले प्रभावी लोक बाहेरून मंत्रिमंडळात आणण्यात आले. केंद्रात सत्तेत चांगले काम करणारे मंत्री मिळत नसले तरी भाजप हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे, भाजपची तळी उचलून धरणारे लोक भाजपात घेऊन त्यांना उमेदवारीची बक्षिसीही देण्यास सुरुवात केली आहे. यातील किती लोक निवडून येतील, ते निकालानंतर कळेल. यातून एक बाब स्पष्ट होते ती म्हणजे, भाजप आपल्या ध्येय धोरणांचा पुरस्कार करणाऱ्यांचीच दखल घेते. आतापर्यंत सुमारे ४०२ उमेदवार जाहीर केले आहेत. अनेक राज्यांमध्ये भाजपच्या मित्र पक्षांशी वाटाघाटी सुरू आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत त्या राज्यांमधील उमेदवारही निश्चित होतील. काँग्रेस आपल्या इंडी आघाडीतील मित्र पक्षांशी वाटाघाटी करत आहे. काँग्रेसकडून अनेक ठिकाणचे उमेदवार अद्याप जाहीर व्हायचे आहेत. भाजपने त्यात बरीच मजल मारली आहे.