मडगाव रॉयल्सकडून मठग्राम वॉरियर्सचा दारुण पराभव

सिंक रेंजर्सचा सलग दुसरा विजय : आल्कॉन जीएसबी युनिटी कप २०२४

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
24th March, 12:28 am
मडगाव रॉयल्सकडून मठग्राम वॉरियर्सचा दारुण पराभव

मडगाव : गोवा जीएसबी स्पोर्ट्स अँड चॅरिटेबल ट्रस्टने गोवा सारस्वत समाजाच्या सहकार्याने आयोजित आल्कॉन जीएसबी युनिटी कप टी-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत शनिवारी मडगाव रॉयल्सने मठग्राम वॉरियर्सचा ९४ धावांनी दारूण पराभव केला. दिवसातील दुसर्‍या सामन्यात सिंक रेंजर्सने नाईट आर्चर्सला ३६ धावांनी पराजित केले. दोन्ही सामने मडगाव एमसीसी मैदानावर खेळविण्यात आले.
सकाळच्या सत्रात झालेल्या पहिल्या सामन्यात मडगाव रॉयल्सने निर्धारित २० षटकांत ८ बाद १९२ असा डोंगर उभा केला. यानंतर त्यांनी मठग्राम वॉरियर्सचा डाव ९८ धावांत संपवला. विजयी संघाकडून सामनावीर आदित्य दलालने अष्टपैलू चमक दाखवली. त्याने फलंदाजीत ३६ धावांचे योगदान देताना गोलंदाजीत ५ धावांत ३ गडी बाद केले. मडगाव रॉयल्सचा या स्पर्धेतील हा पहिलाच विजय ठरला, तर मठग्रामला सलग दुसर्‍या पराभवाचा सामना करावा लागला.
दिवसातील दुसर्‍या सामन्यात सिंक रेंजर्सने वेद म्हांबरे व सनत म्हापणे यांनी तिसर्‍या गड्यासाठी केलेल्या ५१ धावांच्या भागीदारीच्या जोरावर दीडशे धावांच्या आसपास मजल मारताना ७ बाद १४७ धावा केल्या. यानंतर त्यांनी नाईट आर्चर्सचा डाव ९ बाद १११ असा रोखताना विजयाला गवसणी घातली. ३९ धावा केलेल्या सनत म्हापणे सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. सिंक रेंजर्सचा या स्पर्धेतील हा सलग दुसरा विजय ठरला.
संक्षिप्त धावफलक
मडगाव रॉयल्स : २० षटकांत ८ बाद १९२ (आदित्य दलाल ३६, ग्रांथिक बुयाव ३६, सनथ प्रभुदेसाई २८, शील आंगले नाबाद २०, सागर कामत ३५-२, श्रीनिवास केणी, रसिक पै खोत, तन्मय सुखटणकर, नीलय नाईक दलाल प्रत्येकी १ विकेट) विजयी वि. मठग्राम वॉरियर्स : २० षटकांत सर्वबाद ९८ (मयुर कामत २०, आशय आंबे १९, नीलय नाईक दलाल १६, नीमय कामत १५-४, आदित्य दलाल ५-३, ग्रांथिक बुयाव १३-२, शील आंगले १ विकेट)
सिंक रेंजर्स : २० षटकांत ७ बाद १४७ (सनत म्हापणे ३९, वेद महांबरे ३६, मिहीर कुंडईकर ३०, गौरव बोरकर ८-२, निकित नाईक दलाल २४-२, वृषभ कुंकळ्येकर १ विकेट) विजयी वि. नाईट आर्चर्स : २० षटकांत ९ बाद १११ (आमोद तळावलीकर २९, चैतन्य कामत नाबाद १७, योगेश दलाल १२, वेद म्हांबरे १७-२, अमेय प्रभुदेसाई, सुयश कामत, मेघ नेत्रावळकर, सनत कामत प्रत्येकी १ विकेट)

आजचे सामने
संघ : सिंक रेंजर्स वि. सीक्यूएस स्कोअरिंग विलोज
वेळ : सकाळी ९.३०
........
संघ : म्हापसा ड्रीम क्रशर्स वि. मडगाव रॉयल्स
वेळ : दुपारी २.००
(दोन्ही सामने मडगावच्या एमसीसी मैदानावर)