विक्रांत शेट्टी, मैथीच्या बँक खात्यात ७.३१ कोटी रुपये जमा!

जमीन व्यवहारातून मालामाल : आणखी चौकशीची आवश्यकता असल्यामुळे ईडीकडून जामिनास विरोध

Story: प्रसाद शेट काणकोणकर। गोवन वार्ता |
29th February, 05:22 am
विक्रांत शेट्टी, मैथीच्या बँक खात्यात ७.३१ कोटी रुपये जमा!

पणजी : जमीन हडप प्रकरणात ईडीने मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायदा २००२ अंतर्गत अटक केलेल्या विक्रांत शेट्टी आणि राजकुमार मैथी या दोघांच्या बँक खात्यात जमीन व्यवहारातून ७.३१ कोटी रुपये जमा झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांची अधिक चौकशीची आवश्यकता असल्यामुळे त्यांचा जामीन फेटाळण्याची मागणी ईडीने न्यायालयात केली आहे.

राज्यात बनावट कागदपत्रे तयार करून जमिनी हडप केल्याच्या अनेक तक्रारी आल्यानंतर सरकारने एसआयटी स्थापन केली. त्यानंतर एसआयटीने ५१ गुन्हे दाखल करून चौकशी केली. या प्रकरणात मनी लाँड्रिंगचा संशय व्यक्त करुन ईडीने म्हापसा पोलीस स्थानकात दाखल झालेल्या तीन गुन्ह्यांची प्राथमिक चौकशी केली. त्यात मनी लाँड्रिंग असल्याचे समोर आल्यानंतर ईडीने मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायदा २००२ अंतर्गत कारवाई सुरू केली. त्यानंतर ईडीने मुख्य सूत्रधार विक्रांत शेट्टी, मोहम्मद सुहेल, राजकुमार मैथी आणि इतरांनी बळकावलेल्या ३९.२४ कोटींच्या ३१ मालमत्ता तात्पुरत्या जप्त करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ईडीने गुरुवार, १५ रोजी मुख्य सूत्रधार विक्रांत शेट्टी आणि राजकुमार मैथी या दोघांना चौकशीसाठी पाचारण केले होते. त्यावेळी ते दोघे माहिती लपवत होते. तसेच तपासात सहकार्य करत नसल्यामुळे ईडीने त्या दोघांना अटक केली. त्यांना न्यायालयाने ईडीची कोठडी ठोठावली. याचदरम्यान, संशयित शेट्टी आणि मैथी या दोघांनी न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला. या प्रकरणी न्यायालयात सुनावणी झाली असता, शेट्टी याच्या विरोधात तीन गुन्हे दाखल करण्यात आले. याशिवाय त्याच्या नावावर सहा भूखंड करण्यात आले होते. त्यातील तीन भूखंड टोळीने विक्री केले आहेत. तर तीन भूखंड ईडीने तात्पुरते जप्त केले आहेत. विक्री केलेल्या तीन भूखंडातून सुमारे ३.५ कोटी रुपयांचा व्यवहार झाला असून त्यातील २.७२ कोटी रुपये त्याच्या बँक खात्यात जमा करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

दुसरा संशयित राजकुमार मैथी याच्याविरोधात ९ गुन्हे दाखल झाले आहेत. टोळीने सात भूखंड विक्री केले असून त्यातून सुमारे ४.५ कोटी रुपये मैथी याच्या बँक खात्यात जमा झाल्याचे समोर आले आहे.



हेही वाचा