भारतीय संविधान ही आपली मूलभूत रचना!

जोसेफ पेरुमथोट्टम : राज्यपालांच्या ‘मूलभूत संरचना आणि प्रजासत्ताक’ पुस्तकाचे प्रकाशन

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
28th February, 12:22 am
भारतीय संविधान ही आपली मूलभूत रचना!

पुस्तक प्रकाशन सोहळ्यावेळी राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई, मुख्य बिशप जोसेफ पेरुमथोट्टम, मंत्री सुभाष शिरोडकर, खासदार सदानंद शेट तानावडे व इतर.

पणजी : आपण सर्व भारतीय संविधानावर विश्वास ठेवतो, जी आपली मूलभूत रचना आहे आणि ती आपल्याला भारताचे अभिमानी नागरिक म्हणून सामर्थ्य, आत्मविश्वास देते. भारताला राजकीय आणि सामाजिक अशा दोन्ही नेत्यांची गरज आहे, असे प्रतिपादन केरळच्या चांगनाचेरीचे मुख्य बिशप जोसेफ पेरुमथोट्टम यांनी केले.
राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी लिहिलेले २१२ वे पुस्तक ‘मूलभूत संरचना आणि प्रजासत्ताक’ चे चांगनाचेरी, केरळचे मुख्य बिशप जोसेफ पेरुमथोत्तम यांच्याहस्ते आणि जलस्त्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांच्या विशेष उपस्थितीत प्रकाशन झाले. त्यावेळी पेरुमथोट्टम बोलत होते.
पुस्तकाची पहिली प्रत सुभाष शिरोडकर यांनी चांगनाचेरीचे मुख्य बिशप जोसेफ पेरुमथोत्तम यांच्याहस्ते स्वीकारली. राजभवनच्या जुन्या दरबार सभागृहात पुस्तक प्रकाशन सोहळा पार पडला. राज्यसभा खासदार सदानंद तानावडे आणि गोवा विद्यापीठाचे कुलगुरू हरिलाल मेनन यावेळी उपस्थित होते. रीता श्रीधरन पिल्लई यांनीही यावेळी उपस्थिती लावली.
यावेळी राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी सांगितले की, मूलभूत संरचना आणि प्रजासत्ताक पुस्तकात सुवर्णमहोत्सवी भाषणांचा आणि विशेषत: केशवानंद भारती व्ही/एस संन्यासी प्रकरणाचा समावेश आहे. ज्याचा निर्णय १३ न्यायाधीशांच्या खंडपीठाने दिला होता आणि या निर्णयाची सर्वात लांब सुनावणी ६६ दिवस चालली होती.
जलस्त्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांनी मनोगत व्यक्त केले. राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे आणि गोवा विद्यापीठाचे कुलगुरू हरिलाल मेनन यांचीही भाषणे झाली.
राज्यपालांचे सचिव एमआरएम राव यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. राज्यपालांचे विशेष अधिकारी मिहीर वर्धन यांनी प्रास्ताविक केले.      

हेही वाचा