ध्रुव चमकला; टीम इंडियाची मालिकेत आघाडी

चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लंडवर ५ गड्यांनी मात : गिल-जुरेलची निर्णायक भागीदारी

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
27th February, 12:25 am
ध्रुव चमकला; टीम इंडियाची मालिकेत आघाडी

रांची : रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाने इंग्लंडवर चौथ्या कसोटी सामन्यातील चौथ्या दिवशी ५ गड्यांनी विजय मिळवला. इंग्लंडने टीम इंडियाला विजयासाठी १९२ धावांचे आव्हान दिले होते. टीम इंडियाने हे आव्हान ६१ षटकांत ५ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. शुबमन गिल आणि ध्रुव जुरेल या जोडीने निर्णायक भागीदारी करत टीम इंडियाला विजयापर्यंत पोहचवले. तर आर. अश्विन, कुलदीप यादव आणि यशस्वी जयस्वाल यांनी टीम इंडियाच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली. टीम इंडियाने या विजयासह ५ सामन्यांची मालिका ३-१ अशा फरकाने जिंकली. टीम इंडियाची हा भारतातील १७ वा मालिका विजय ठरला.
इंग्लंडने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. इंग्लंडने पहिल्या डावात सर्वबाद ३५३ धावा केल्या. जो रुटच्या शतकी खेळीच्या जोरावर इंग्लंडला ३०० पार मजल मारता आली. रुट व्यतिरिक्त भारतीय गोलंदाजांसमोर इंग्लंडच्या एकाही फलंदाजाला फार वेळ मैदानात टिकता आले नाही. टीम इंडियाकडून रवींद्र जडेजाने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. डेब्यूटंट आकाश दीपने ३ विकेट्स घेतल्या. मोहम्मद सिराजला २ आणि अश्विनच्या खात्यात १ विकेट गेली.
ध्रुव जुरेल ठरला तारणहार
इंग्लंडच्या ३५३ धावांच्या प्रत्युत्तरात पहिल्या डावात टीम इंडियाची निराशाजनक सुरुवात राहिली. टीम इंडियाने ठराविक अंतराने विकेट्स गमावल्या. मात्र, ध्रुव जुरेलने एकट्याने किल्ला लढवला. ध्रुवने ९० धावांची झुंजार खेळी केली. ध्रुवच्या या खेळीत ६ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश होता. ध्रुवच्या या चिवट खेळीच्या जोरावर टीम इंडियाला ३०० पार पोहचता आले. टीम इंडियाचा डाव ३०७ धावांवर आटोपल्यामुळे इंग्लंडला ४६ धावांची आघाडी मिळाली.
त्यानंतर टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर इंग्लंडला गुंडाळण्याचे आव्हान होते. ही जबाबजारी आर अश्विन आणि कुलदीप यादव या दोघांनी सार्थपणे पार पाडली. अश्विनने ५ विकेट्स घेतल्या. कुलदीपने चौघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर जडेजाच्या खात्यात १ विकेट गेली. टीम इंडियाने इंग्लंडचे दुसऱ्या डावात १४५ धावांवर पॅकअप केल्याने विजयासाठी १९२ धावांचे आव्हान मिळाले. टीम इंडियाने तिसऱ्या दिवसअखेर बिनबाद ४० धावा करत आश्वासक सुरुवात केली.
चौथ्या दिवसाचा खेळ
चौथ्या दिवसाच्या खेळाला कर्णधार रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल जोडीने सुरुवात केली. मात्र, जो रुटच्या गोलंदाजीवर ४१ वर्षीय जेम्स एंडरसने झेल घेत इंग्लंडला पहिली विकेट मिळवून देण्यात निर्णायक भूमिका बजावली. यशस्वीने ३७ धावा केल्या. यशस्वीनंतर रोहितने काही वेळ किल्ला लढवला आणि अर्धशतक ठोकले. मात्र, रोहित नंतर ५५ धावा करून माघारी परतला. मागावून आलेला रजत पाटीदारही आला तसाच शून्यावर परतला. त्यामुळे इंग्लंडने कमबॅक केले.
ध्रुव-शुबमनने भारताचा डाव सावरला
त्यानंतर शोएब बशीर याने रवींद्र जडेजा आणि सरफराज खान दोघांना सलग २ चेंडूमध्ये आऊट केल्याने टीम इंडिया आता अडचणीत सापडली. मात्र, ध्रुव जुरेल पुन्हा मदतीला धावून आला. ध्रुव आणि शुबमन गिल या दोघांनी टीम इंडियाचा डाव सावरला. संयमी खेळी करत १-१ धाव जोडत टीम इंडियाला विजयी केले. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी ७२ धावांची नाबाद विजयी भागीदारी केली. शुबमन गिलने या दरम्यान सहावे कसोटी अर्धशतक ठोकले. गिलने नाबाद ५२ धावा तर ध्रुवने नाबाद ३९ धावा केल्या. इंग्लंडकडून शोएब बशीरने सर्वाधिक ३ गडी बाद केले. तर जो रुट आणि टॉम हार्टली या दोघांना १-१ विकेट मिळाली.
संक्षिप्त धावसंख्या

इंग्लंड : प. डाव सर्वबाद ३५३ धावा.
दुसरा डाव सर्वबाद १४५ धावा.
भारत : प. डाव सर्वबाद ३०७ धावा
दुसरा डाव ५ बाद १९२ धावा
सामनावीर : ध्रुव जुरेल

१२ वर्षांत १७ वा मालिका विजय
गेल्या १२ वर्षांत घरच्या मैदानावर भारताचा हा सलग १७ वा मालिका विजय आहे. मायदेशात सलग सर्वाधिक मालिका जिंकण्याचा विक्रम भारतीय संघाच्या नावावर आहे. मायदेशात सलग १० मालिका जिंकून ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानावर आहे.
इंग्लंडविरुद्ध भारतात सलग तिसरा मालिका विजय
भारताला २०१२ मध्ये घरच्या मैदानावर कसोटी मालिकेत पराभवाला सामोरे जावे लागले होते. तेव्हा इंग्लंडने भारताचा २-१ असा पराभव केला. त्यानंतर टीम इंडियाने घरच्या मैदानावर एकही मालिका गमावलेली नाही आणि सलग १७ वेळा प्रतिस्पर्धी संघाचा पराभव केला आहे. भारताने इंग्लंडविरुद्ध घरच्या मैदानावर सलग तिसरा मालिका विजय मिळवला आहे. २०१२ नंतर भारताने २०१६-१७ मध्ये इंग्लंडचा ३-०, २०२०-२१ मध्ये ३-१ असा पराभव केला होता आणि आता या मालिकेत ३-१ ने आघाडी घेतली आहे.
अश्विन भारतात सर्वाधिक कसोटी बळी घेणारा गोलंदाज
ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन हा भारतीय खेळपट्ट्यांवर कसोटीत सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे. त्याने आपल्याच देशाचा दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबळेला मागे टाकले आहे. अश्विनच्या नावावर भारतातील ५९ कसोटी सामन्यांमध्ये ३५४ बळी आहेत, तर कुंबळेच्या नावावर ६३ सामन्यांमध्ये ३५० बळी आहेत. या यादीत तिसरे नाव आहे ते हरभजन सिंगचे. हरभजनच्या नावावर २६५ विकेट आहेत.
रोहित शर्माच्या ४ हजार कसोटी धावा पूर्ण
भारतीय कर्णधार रोहित शर्माने आपल्या कसोटी कारकिर्दीत चार हजार धावा पूर्ण केल्या आहेत. ५९ सामने आणि १०० डावांमध्ये त्याने हे यश संपादन केले आहे. त्याच्या आधी वीरेंद्र सेहवाग, सुनील गावस्कर, राहुल द्रविड, चेतेश्वर पुजारा, सचिन तेंडुलकर, विराट कोहली, मोहम्मद अझरुद्दीन, जी विश्वनाथ आणि गौतम गंभीर या भारतीय फलंदाजांनी कसोटीत ४ हजारांहून अधिक धावा केल्या आहेत.