परस्पर दिलेले ‘ना हरकत’ दाखले मागे घेण्याची पंचायतीवर नामुष्की

कासारवर्णे ग्रामसभेत ग्रामस्थ आक्रमक : सरपंचांना घेतले फैलावर

Story: वार्ताहर । गोवन वार्ता |
26th February, 12:28 am
परस्पर दिलेले ‘ना हरकत’ दाखले मागे घेण्याची पंचायतीवर नामुष्की

ग्रामसभेत उपस्थित ग्रामस्थ. (मकबूल माळगीमनी)

कोरगाव : ग्रामसभेत न मांडता आणि जाहीर नोटीस न बजावता पंचायत क्षेत्रातील लोकांना अंधारात ठेवून पंचायतक्षेत्राबाहेरील व्यावसायिकांना दिलेले ना हरकत दाखले मागे घेण्यास कासारवर्णे ग्रामस्थांनी सरपंचांना भाग पाडले. तसा ठराव मंजूर करून घेण्यात आला.
मागील दोन ग्रामसभा स्थगित झाल्यानंतर रविवारची ग्रामसभा वादळी ठरणार अशीच लोकांची भावना होती. उदय महाले यांनी लेखी स्वरूपात विचारलेल्या प्रश्नांवर उत्तर देताना सरपंच अवनी गाड यांच्या अध्यक्षतेखालील ग्रामसभा सुरळीतपणे चालली होती. दरम्यान, पुणे येथील एका व्यावसायिकाला व्यवसायासाठी पंचायत मंडळाकडून बहुमताच्या बळावर दिलेला ना हरकत दाखला कळीचा मुद्दा बनला. त्यामुळे ग्रामसभेत गोंधळ निर्माण झाला.
पंचायतक्षेत्राबाहेरील कोणालाही ना हरकत दाखला देऊ नये, असा ठराव यापूर्वीच मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे बाहेरील कोणालाही ना हरकत दाखला देता येणार नाही. व्यावसायिकाला दिलेला ना हरकत दाखला रद्द करण्यात यावा, असा ठराव आत्माराम केणी यांनी मांडला. त्याला संजय आरोंदेकर यांनी अनुमोदन दिले. याला लोकांचा विरोध झाला नाही. त्यामुळे हा ठराव बिनविरोध संमत झाला.
शेवटी गोंधळाच ग्रामसभा आटोपती घेण्यात आली.