मातेने ओलांडली क्रूरतेची सीमा!... नवजात बाळाला ओव्हनमध्ये ठेवून शिजवले

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
12th February, 04:29 pm
मातेने ओलांडली क्रूरतेची सीमा!... नवजात बाळाला ओव्हनमध्ये ठेवून शिजवले

न्यूयॉर्क : स्त्रीच्या अंतःकरणातील वात्सल्यभाव म्हणजे ‘आई’. हाच भाव हरवलेल्या एका स्त्रीने क्रूरतेच्या सर्व सीमाच ओलांडल्या आहेत. तिने नवजात मुलीला अक्षरशः ओव्हनमध्ये ठेवून शिजवून काढले. ओव्हनमधील उष्णतेच्या चटक्याने त्या नवजात ‌शिशूची नाजूक त्वचा तर जळालीच. पण आतली हाडेही शिल्लक राहिली नाही. हे क्रूर पाप करणाऱ्या महिलेला आता फाशीची शिक्षा देण्याची मागणी होत आहे.

वरील हृदयद्रावक घटना अमेरिकेतील मिसुरी शहरात घडली. मारिया थॉमस असे या क्रूर महिलेचे नाव आहे. ती २६ वर्षांची असून ती सध्या तुरुंगात आहे. पोलिसांनीही या घटनेचे ‘भयंकर’ असेच वर्णन केले आहे. जरिया माई असे मृत मुलीचे नाव असून तिचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत सापडला होता. तिचे कपडेही वितळले होते. ही घटना घडत असताना मारिया झोपी गेली होती. जेव्हा ती जागी झाली तेव्हा तिला मुलीचा मृत्यू झाल्याचे लक्षात आले. तिने लगेच कुटुंबीयांना फोन केला. त्यानंतर जरियाचे आजोबा घरी आले, समोरचे दृश्य पाहून त्यांना धक्काच बसला. त्यांनी आरडाओरडा केला.

हा नक्की या प्रकार आहे, याविषयी मारियाला विचारले असता, तिने चुकून बाळाला ओव्हनमध्ये ठेवल्याचे सांगितले. त्यानंतर तिला झोप लागली. जागी आली तेव्हा घरात जळाल्याचा वास पसरला होता, असे तिने सांगितले.

मुलीच्या आजोबांच्या तक्रारीवरून हत्येचा गुन्हा दाखल केला असून आरोपी महिलेला अटक केली आहे. हे प्रकरण जॅक्सन काउंटी कोर्टात प्रलंबित आहे. सरकारी वकिलाने मारियाला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. मारियाने एकतर जाणूनबुजून बाळाला ओव्हनमध्ये ठेवले किंवा झोपेत असताना निष्काळजीपणाने चूक केली. पोलिसांनी घटनास्थळावरून पुरावे गोळा केले आहेत. पोलीस पुढील तपास करत आहे.