मडगावच्या उपनगराध्यक्षपदासाठी केवळ बबिता नाईक यांचाच अर्ज

केवळ एकाच नगरसेविकेचा अर्ज असल्याने बिनविरोध निवड : उद्या होणार घोषणा

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
12th February 2024, 01:25 pm
मडगावच्या उपनगराध्यक्षपदासाठी केवळ बबिता नाईक यांचाच अर्ज

मडगाव : येथील पालिकेच्या रिक्त झालेल्या उपनगराध्यक्ष पदासाठी आज अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या दिवशी नगरसेविका बबिता नाईक यांनीच तीन अर्ज दाखल केले आहेत. केवळ एकाच नगरसेविकेने अर्ज दाखल केल्याने त्यांची बिनविरोध निवड जवळजवळ निश्चित झाली आहे. उद्या (ता. १३) निवडणूक प्रक्रिया झाल्यानंतर तशी रीतसर घोषणा केली जाणार आहे.

मडगाव पालिकेतील राजकीय घडामोडीनंतर दीपाली सावळ यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला. त्यानंतर उपनगराध्यपद रिक्त झाले आहे. या पदाच्या निवडणुकीसाठी पालिका संचालक ब्रिजेश मणेरीकर यांनी सर्व नगरसेवकांना पत्र पाठवले होते. त्यानुसार, निवडणूक अधिकारी म्हणून सासष्टीचे उपजिल्हाधिकारी रमेश गावकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सोमवारी अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख होती. या मुदतीत मुख्याधिकारी गौरीश शंखवाळकर यांच्याकडे नगरसेविक बबिता नाईक यांचेच तीन अर्ज सादर झालेले आहेत. यात माजी उपनगराध्यक्ष दीपाली सावळ, नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर व नगरसेवक कामिल बार्रेटो अशा तिघांनी अनुमोदन दिलेले तीन अर्ज आहेत. बबिता नाईक यांचाच अर्ज आलेला असल्याने त्यांची उपनगराध्यक्षपदी निवड निश्चित झालेली आहे. सध्या पालिकेत भाजपप्रणित नगरसेवकांची सत्ता असून हा निर्णय सर्वानुमते घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.