न्यूयॉर्क : आईला देवाचा दर्जा दिला जातो. आईच्या हाकेचा मुलाच्या हृदयावर थेट परिणाम होतो. आपल्या मुलाला खोलवर समजून घेणारी आईच असते. मुलालाही आपल्या आईचे प्रत्येक भाव समजतात. अशीच आई-मुलीच्या नात्याची अनोखी कहाणी अमेरिकेत पाहायला मिळाली. इथे गेल्या पाच वर्षांपासून कोमात असलेल्या आणि जीवन-मृत्यूमध्ये झुंजत असलेल्या एका मुलीने आईच्या एका विनोदावर हसून डोळे उघडले. हे पाहून उपस्थित डॉक्टरांच्या तोंडातूनही ‘चमत्कार झाला’, अशी प्रतिक्रिया उमटली.
मिशिगनमधील जेनिफर फ्लेवेलेन ही महिला पाच वर्षांपूर्वी म्हणजे २०१७ मध्ये एका रस्ता अपघातात गंभीर जखमी झाली होती. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र ती कोमात गेली. सर्व प्रयत्न करूनही जेव्हा ती शुद्धीवर येऊ शकली नाही, तेव्हा डॉक्टर तिला दैवावर सोपवले होते. पण, या घटनेनंतर पाच वर्षांनी जेनिफर फ्लेवेलनने २५ ऑगस्ट २०२२ रोजी डोळे उघडले. जेनिफरची आई तिच्या बेडजवळ उभी राहून तिला एक विनोद सांगत होती. अचानक जेनिफर तो विनोद ऐकून हसत बेडवर उठून बसली. पीपल या न्यूज मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत जेनिफरची आई पेगी मीन्सने या घटनेबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.
जेनिफरला जेव्हा जाग आली तेव्हा सुरुवातीला ती घाबरली. कारण ती हसत जागी झाली होती. असे तिने पूर्वी कधीच केले नव्हते. जे दार खूप दिवसांपासून बंद होते आणि जे आम्हाला (आई आणि मुलीला) वेगळे ठेवत होते, ते आता उघडले आहे. आम्ही परत आलो. जेनिफर तेव्हा उठली, पण ती पूर्णपणे उठू शकली नाही. तिला बोलता येत नव्हते. ती मान हलवत होती, असे पेगी यांनी मुलाखतीत नमूद केले आहे.
तिने सांगितले की सुरूवातीला ती अजूनही खूप झोपली होती, पण नंतर जसजसे महिने उलटले तसतसे ती अधिकच जागे होऊ लागली. जेनिफरचा आवाज गेला आहे. शरीर सुन्न आहे. आवाज परत येण्यासाठी आणि शरीराची हालचाल पूर्ववत करण्यासाठी ती कठोर परिश्रम करत आहे. या कामात तिला डॉक्टरांच्या पथकाची मदत मिळत आहे, असेही पेगी यांनी म्हटले आहे.
मिशिगनमधील मेरी फ्री बेड रिहॅबिलिटेशन हॉस्पिटलमधील त्यांचे फिजिशियन डॉ. राल्फ वांग यांनी ‘ही घटना खरोखरच दुर्मिळ आहे’, असे म्हटले आहे. या प्रकारच्या कोमातून फार कमी लोक बाहेर येतात आणि काही जण बाहेर आले तरी त्यांच्या शरीरात कोणतीही लक्षणीय प्रगती होत नाही. परंतु, जेनिफरमध्ये सातत्याने सुधारणा होत आहे. काही दिवसांपूर्वी ती फुटबॉलची मॅच पाहायला गेली होती. डॉक्टरही याला चमत्कार मानत आहेत.