ऑस्ट्रेलिया चौथ्यांदा वर्ल्ड चॅम्पियन

भारतीय ज्युनियर संघाचे अंडर-१९ विश्व चॅम्पियन बनण्याचे स्वप्न भंगले

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
12th February 2024, 12:20 am
ऑस्ट्रेलिया चौथ्यांदा वर्ल्ड चॅम्पियन

बेनोनी : भारतीय ज्युनियर संघाचे अंडर-१९ विश्व चॅम्पियन बनण्याचे स्वप्न भंगले आहे. अंडर-१९ विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा ७९ धावांनी पराभव केला. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत कांगारूंनी भारताचा प्रथमच पराभव केला आहे. ऑस्ट्रेलियाने चौथे विजेतेपद पटकावले आहे. यापूर्वी २०१० मध्ये पाकिस्तानचा २५ धावांनी पराभव करून संघ चॅम्पियन बनला होता.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने ५० षटकांत सात गडी गमावून २५३ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघ ‍४३.५ षटकांत १७४ धावांवर गारद झाला. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय डावाची सुरुवात खराब झाली. सामन्याच्या तिसऱ्या षटकांत कुलकर्णीच्या रूपात भारताला पहिला झटका बसला. यानंतर ठरावीक अंतराने भारताचे फलंदाज बाद होत गेले. भारताकडून आदर्श सिंगने सर्वाधिक ४७ धावा केल्या. त्याच्यासह मुर्गन अभिषेकने ४२ धावांची खेळी केली. यांच्याशिवाय भारतीय फलंदाजांना मैदानावर फारकाळ टिकता आले नाही.
गोलंदाजीमध्ये ऑस्ट्रेलियाकडून राफ मॅकमिलन आणि महिल बिहर्डमॅन यांनी प्रत्येकी ३ विकेट घेतल्या. यांच्यासह कॅलम विडलरने २ तर, चार्ली अँडरसन आणि टॉम स्ट्रेकर यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
ऑस्ट्रेलियाची खराब सुरुवात
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली. सामन्याच्या तिसऱ्या ओव्हरमध्ये सॅमच्या रूपात ऑस्ट्रेलियाला पहिला झटका बसला. त्याला भारताचा वेगवान गोलंदाज राज लिंबानीने क्लीन बोल्ड केले. आपल्या आठ बॉलच्या खेळीत सॅमला धावांचा भोपळाही फोडता आला नाही. सामन्यातील पहिल्या १० ओव्हरमध्ये भारतीय गोलंदाजांनी शिस्तबद्ध गोलंदाजी केल्यामुळे ऑस्ट्रेलियाला मोठी मजल मारता आली नाही. सामन्यातील १० ओव्हरमध्ये ऑस्ट्रेलियाने १ विकेट गमावून ४४ धावा केल्या.
नमन तिवारीचा डबल धमाका
तिसऱ्या ओव्हरमध्ये पहिली विकेट पडल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी सावध खेळी करत धावफलक हलता ठेवला. सामन्याच्या २१ व्या ओव्हरमध्ये ऑस्ट्रेलियाचा कर्णधार वायबगेनचे अर्धशतक दोन धावांनी हुकले. त्याला नमन तिवारीने ४८ धावांवर बाद केले. डिक्सन आणि वायबगेन यांनी दुसऱ्या विकेटसाठी ७८ धावांची भागीदारी केली.या पाठोपाठ हॅरीच्या रूपात ऑस्ट्रेलियाला आणखी एक धक्का बसला. हॅरी डिक्सन ४२ धावा करून बाद झाला. सामन्याच्या २३व्या ओव्हरमध्ये त्याला नमन तिवारीने मुरुगन अभिषेककरवी झेलबाद केले.
सामन्यातील ३५व्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर राज लिंबानीने रायन हिक्सला बाद केले. त्याने आपल्या खेळीत २० धावा केल्या. हरजस सिंग आणि हिक्स यांनी चौथ्या विकेटसाठी ६६ धावांची भागीदारी केली. हॅरी बाद झाल्यानंतर हरजस सिंग आणि हिक्स यांनी संयमी खेळी करत चौथ्या विकेटसाठी ६६ धावांची भागिदारी केली. सामन्याच्या ३५व्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर राज लिंबानीने रायन हिक्सला बाद केले. तो २० धावा करून बाद झाला.
एका बाजूने विकेट पडत असताना हरजस सिंग एका बाजूने आक्रमक खेळी करत होता. त्याने आपल्या खेळीत ६४ चेंडूत ५५ धावांची खेळी केली. यामध्ये त्याने ३ चौकार आणि ३ षटकार लगावले. त्याला सौम्या पांड्येने बाद केले. हरजस सिंगल बाद झाल्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या रॉफे मॅकलिन अवघ्या २ धावाकरून बाद झाला. त्याला मुशीर खानने झेलबाद केले.
चार्ली अँडरसनच्या रूपाने ऑस्ट्रेलियाला सातवा धक्का बसला. तो १८ चेंडूत १३ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. राज लिंबानीने त्याला बाद केले. निर्धारित ५० षटकांत ऑस्ट्रेलियाने ७ विकेट गमावून २५३ धावा केल्या आणि भारताला सामना जिंकण्यासाठी २५४ धावांचे लक्ष्य ठेवले.
भारताकडून गोलंदाजीमध्ये राज लिंबानीने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या. तर, नमन तिवारीने २ विकेट घेतल्या. याच्यासह पांड्ये आणि मुशीर खानने प्रत्येकी १ विकेट घेतली.
अंडर-१९ विश्वचषकात कांगारूचे चौथे विजेतेपद
अंडर-१९ विश्वचषक स्पर्धेतील ऑस्ट्रेलियाचे हे चौथे विजेतेपद आहे. याआधी त्यांनी १९८८, २००२ आणि २०१० मध्येही विजेतेपद पटकावले होते. ऑस्ट्रेलियाने १४ वर्षांनंतर अंडर-१९ विश्वचषक जिंकला आहे. तर भारत पाच वेळा चॅम्पियन आहे. भारताने २०००, २००८, २०१२, २०१८ आणि २०२२ मध्ये विजेतेपदावर कब्जा केला होता. यासह ऑस्ट्रेलियाने सलग दुसरा अंडर-१९ विश्वचषक जिंकण्याचा भारताचा इरादाही उधळला. आतापर्यंत केवळ पाकिस्तानलाच सलग दोनदा अंडर-१९ विश्वचषक जिंकता आला आहे. २००४ आणि २००६ मध्ये त्यांनी हे साध्य केले होते.

भारताच्या सौम्य पांडेने रचला इतिहास

अंडर १९ वर्ल्ड कप फायनल २०२४ सामन्यात टीम इंडियाच्या सौम्य पांडेने इतिहास रचला आहे. सौम्य पांडे टीम इंडियाकडून अंडर १९ वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेणारा पहिला गोलंदाज ठरला आहे. सौम्यने टीम इंडियाचा स्पिनर रवी बिश्नोई याला मागे टाकत हा कारनामा केला. बिश्नोईने २०२० च्या अंडर १९ वर्ल्ड कपमध्ये १७ विकेट्स घेतल्या होत्या. तर सौम्य पांडने या वर्ल्ड कपमध्ये १८ गडी बाद केले आहेत.

संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया : ५० षटकांत ७ बाद २५३ धावा
भारत : ४३.५ षटकांत सर्वबाद १७४ धावा
सामनावीर : महिल बिहर्डमॅन