कोलवा पोलिसांकडून दुचाकीचालकावर गुन्हा
मडगाव : दुचाकीचालक मारिया फर्नांडिस (३१, रा. कोलवा) यांच्यासह दुचाकीने प्रवास करणारी मग्दालिना फर्नांडिस (६४, देऊ, केपे) ही महिला बसला ओव्हरटेक करताना गतिरोधकावर गाडी आदळताच रस्त्यावर पडली व बसच्या चाकाखाली आली. उपचारादरम्यान शनिवारी मग्दालिना हिचा मृत्यू झाला असून कोलवा पोलिसांनी दुचाकीचालक मारिया फर्नांडिसविरोधात गुन्हा नोंद केला आहे.
मग्दालिना फर्नांडिस या मारिया फर्नांडिस यांच्यासह दुचाकीवरुन बाणावली ते वास्को असा प्रवास करत होत्या. बाणावली लक्ष्मी मंदिरानजीक पुढे जाणाऱ्या बसला ओव्हरटेक करताना गाडी गतिरोधकावर आदळली. गाडी वेगात असल्याने दुचाकीचालक मारिया यांच्या पाठिमागे बसलेल्या मग्दालिना फर्नाडिस या मागे रस्त्यावर पडल्या. यावेळी मागाहून येणाऱ्या बसचे उजव्या बाजूचे पुढील चाक मग्दालिना यांच्या उजव्या हातावरुन गेले. यात मग्दालिना यांना गंभीर दुखापत झाली. अपघातातची ही घटना ५ फेब्रुवारी रोजी ८.५० वा. घडली होती. दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळातील उपचारानंतर त्यांना गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या इस्पितळात दाखल करण्यात आले होते. गोमेकॉत उपचारादरम्यान जखमी मग्दालिना यांचा शनिवारी मृत्यू झाला. याप्रकरणी कोलवा पोलिसांकडून वेगाने व बेदरकारपणे गाडी चालवून मानवी जीव धोक्यात घातल्याप्रकरणी दुचाकीचालक मारिया फर्नांडिस याच्याविरोधात गुन्हा नोंद केला आहे.