कर्मचारी भरती आयोगामार्फतच येणार नोकरभरतीच्या जाहिराती

मुख्यमंत्री डॉ. सावंत : गोवा आता केरोसीनमुक्त राज्य

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
08th February, 12:33 am
कर्मचारी भरती आयोगामार्फतच येणार नोकरभरतीच्या जाहिराती

पणजी : २०२२ पूर्वीची पदे भरण्यासाठी मार्चपर्यंत मुदतवाढ दिलेली असली तरी नव्या पदांच्या जाहिराती यापुढे कर्मचारी भरती आयोगामार्फत जारी केल्या जाणार आहेत. क गटातील भरतीसाठी एक वर्षाचा अनुभव सक्तीचा आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.
राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी उत्तर दिले. चर्चेनंतर अभिभाषणासाठी राज्यपालांना शुभेच्छा देणारा ठराव सभागृहात संमत झाला. राज्यातील ज्या २० हजार लोकांकडे गॅस सिलिंडर नव्हते, त्यांना गॅसची जोडणी दिलेली आहे. यामुळे गोवा आता केरोसीनमुक्त राज्य झाले आहे. पर्पल महोत्सवाचा सर्व खर्च केंद्र सरकारने केला आहे. सरकारने फक्त पर्पल महोत्सवच आयोजित केलेला नाही, तर गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात दिव्यांग केंद्रही सुरू केले आहे. या दिव्यांग केंद्रामार्फत दिव्यांगांवर मोफत उपचार केले जाणार आहेत. अंत्योदय, ग्रामोदय, सर्वोदय या तत्वावर सरकारची वाटचाल सुरू आहे. २२ जानेवारी रोजी अयोध्येत रामलल्लाची प्रतिष्ठापना झाली, त्या दिवशी संपूर्ण गोव्यात कार्यक्रम आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमांमुळे संपूर्ण राज्य राममय झाले होते. गोव्यात रामराज्य सुरू झाल्याने आता कोणालाही घाबरण्याची गरज नाही, असे ते म्हणाले.
राज्यातील मुलांची मानसिक स्थिती चांगली नाही. इतर बऱ्याच कारणांबरोबर मोबाईल हे एक कारण आहे. यासाठी सरकारने शिक्षण संस्थांमध्ये समुपदेशक नियुक्त करायला सुरुवात केली आहे.
रोजगाराचे प्रमाण वाढण्यासाठी मुख्यमंत्री अॅप्रेंटिसशिप योजना सरकारने सुरू केली आहे. यातून कार्य संस्कृती (वर्क कल्चर) तयार करण्याचा हेतू आहे. कौशल्य प्रशिक्षण देणे सर्व संस्थांनी सुरू केले आहे. गोव्यातील तरुण अवजड कामे करू शकत नाहीत, यामुळे शिक्षण, तंत्रज्ञान प्रशिक्षण यावर भर दिला आहे. बेतुल येथे समुद्र भ्रमण प्रशिक्षण सुरू झाले आहे. देशातील हे पहिला प्रशिक्षण केंद्र आहे. सर्व महाविद्यालयांमध्ये आता नोकऱ्यांसाठी कॅम्पस प्लेसमेंट सुरू झाले आहे. गुजरातनंतर विद्या समीक्षा केंद्र सुरू करणारे गोवा हे दुसरे राज्य आहे. या केंद्रामार्फत सर्व विद्यार्थ्यांच्या कामगिरीची नोंद शिक्षण खात्याकडे होणार आहे.

राज्यपालांच्या अभिषाणावर विजय सरदेसाई, वीरेश बोरकर, वेन्झी व्हिएगस यांची टीका करणारी भाषणे झाली, तर आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी राज्यपालांच्या अभिभाषणाची प्रशंसा केली.

आर्थिक स्थितीवर श्वेतपत्रिका काढावी : युरी आलेमाव
गोव्यावर ३६ हजार कोटींचे कर्ज आहे. खनिज उद्योग बंद आहे. नवे उद्योग आलेले नाहीत. यामुळे बेरोजगारीचे प्रमाण वाढत आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केला. खनिज उद्योग बंद असल्यामुळे सर्व भिस्त पर्यटनावर आहे. डिसेंबरमध्ये राज्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्या कमी झाली. राज्यपालांच्या अभिभाषणात म्हादई तसेच व्याघ्र क्षेत्राचा कसलाच उल्लेख नाही, अशी टीका युरी आलेमाव यांनी केली.

गृहआधार योजनेच्या १५०० अर्जांना मान्यता
गृहआधार योजनेच्या नवीन १,५०० अर्जांना सरकारने मान्यता दिली आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले.

रवींद्र केळेकर, मनोहरराय सरदेसाईंची जन्मशताब्दी
ज्ञानपीठ पुरस्कार विजेते रवींद्र केळेकर आणि कवी मनोहरराय सरदेसाई यांची पुढील वर्षी जन्मशताब्दी आहे. राजभाषा संचालनालयातर्फे पुढील वर्षी रवींद्र केळेकर आणि मनोहरराय सरदेसाई यांच्यावर आधारित कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत.

हेही वाचा