पंचायतींनी विकासनिधी गटारात घालवू नये... वाचा, मुख्यमंत्री डॉ. सावंत काय म्हणाले

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
09th December 2023, 01:10 pm
पंचायतींनी विकासनिधी गटारात घालवू नये... वाचा, मुख्यमंत्री डॉ. सावंत काय म्हणाले

साखळी : सरकारकडून दिला जाणारा विकासनिधी गटारात घालवू नयेत. तो विचार सोडून गावात नवनवे विकास प्रकल्प आणण्याच्या दृष्टीने विचार करा, असा सल्ला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्यातील सर्व पंचायतींना दिला आहे.

हरवळे पंचायतीतर्फे ‘कचरा व्यवस्थापन शेड’ व ‘गावठी बाजार शेड’ उभारण्यात आली आहे. या दोन्ही शेडचे उद्घाटन केल्यानंतर मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी जिल्हा पंचायत सदस्य गोपाळ सुर्लकर, साखळीच्या नगराध्यक्ष रश्मी देसाई, हरवळेचे सरपंच अंकुश मळीक, लुपिन फाऊंडेशनचे अधिकारी श्रीनिवास राव कलाकुंटला, उपसरपंच ममता दिवकर, बीडीओ ओमकार मांद्रेकर, स्वयंपूर्ण मित्र सतीश वागोणकर, पंचायत सदस्य संजय नाईक, राजीव मळीक व नंदिनी गावस यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमात स्वयंपूर्ण संकल्पनेखाली स्वावलंबी झालेल्या गावातील व्यावसायिकांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी हरवळे पंचायतीचे कौतुक केले. ‘गोव्यातील सर्वांत लहान पंचायत म्हणून हरवळेकडे पाहिले जाते. या पंचायतीने कचरा व्यवस्थापनात केलेली कामगिरी संपूर्ण राज्यासाठी आदर्शवत आहे. या कामगिरीची दखल राज्यातील इतरही पंचायतींनी घ्यावी व ही संकल्पना आपआपल्या भागांत राबवावी. विश्वकर्मा योजना पंतप्रधानांनी जाहीर केली आहे. पण, हरवळे पंचायतीने पूर्वी असे कार्य केले आहे. गावातील पारंपरिक व्यावसायिकांना प्रशिक्षण दिले आहे. त्याचा ग्रामस्थांना लाभ झाला आहे. गावातील लोकांनी सामाजिक जबाबदारी ओळखून पंचायतीसाठी थोडी जागा दिली असती तर, येथे पंचायतीची प्रशस्त इमारत आतापर्यंत उभी राहिली आहे. राज्यात ही पंचायत सगळ्यात शेवटी स्थापन झाली आहे. तरीही विकासाच्या बाबतीत पुढे आहे’, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यावेळी म्हणाले.