अपुऱ्या मनुष्यबळामुळे फोंडा पोलिसांची दमछाक

कार्यक्षेत्र मोठे, मात्र कर्मचारी कमी : उपनिरीक्षक, हवालदाराची संख्या वाढविण्याची गरज​

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
04th December 2023, 06:23 pm
अपुऱ्या मनुष्यबळामुळे फोंडा पोलिसांची दमछाक

 फोंडा पोलीस स्थानक (संग्रहित) ‍

फोंडा : फोंडा तालुक्यात मोठे क्षेत्र असलेल्या फोंडा पोलीस स्थानकात अपुऱ्या कर्मचारी वर्गामुळे उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांची सध्या धावपळ होत आहे. गेल्या काही महिन्यांपासून पोलीस स्थानकात उपनिरीक्षक व हवालदारांची संख्या कमी असल्याचे दिसून येते. मात्र, फोंडा पोलीस स्थानकाच्या तुलनेत म्हार्दोळ व कुळे पोलीस स्थानकात अधिक कर्मचारी वर्ग असल्याचे दिसून येते. वाढते गुन्हे पाहता फोंडा पोलीस स्थानकात उपनिरीक्षक व हवालदारांची संख्या वाढविणे अत्यंत गरजेचे बनले आहे.
फोंडा पोलीस हद्द मोठी असून बेतोडा व उसगाव औद्योगिक वसाहत आहे. त्याशिवाय सावर्डे, धारबांदोडा व वाळपई मतदारसंघातील उसगाव-गांजे पंचायत फोंडा पोलीस स्थानकाच्या हद्दीत येत आहे. गेल्या काही महिन्यांपासून फोंडा पोलीस स्थानकात उपनिरीक्षक व हवालदारांची संख्या कमी दिसून येत आहे. दोन वर्षांपूर्वी ८ उपनिरीक्षक असलेल्या पोलीस स्थानकात सध्या ४ उपनिरीक्षक काम करीत आहेत. यात गेल्या कित्येक वर्षांपासून एकच महिला उपनिरीक्षक काम करीत असून म्हार्दोळ पोलीस स्थानकातील बलात्कार, विनयभंग व अन्य गुन्ह्यांचा तपास करण्याचे काम पाहत आहे. वाढत्या अपघातामुळे हवालदारांची कमतरता फोंडा पोलीस स्थानकात दिसून येत आहे. पोलीस स्थानकात असलेल्या उपनिरीक्षकांना पोलीस स्थानकात काम करण्याबरोबर विविध ठिकाणी बंदोबस्त करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे गुन्ह्यांचा छडा लावण्यात उशीर होतो.
कुळेसारख्या पोलीस स्थानकात सध्या ४ उपनिरीक्षक आहेत. यात २ पुरुष तर २ महिला उपनिरीक्षकांचा समावेश आहे. लवकरच बदली झालेला आणखी एक उपनिरीक्षक कुळे पोलीस स्थानकात हजेरी लावणार आहे. कुळे पोलीस स्थानकात एकूण ११ हवालदार काम करीत आहेत. म्हार्दोळ पोलीस स्थानकात ३ उपनिरीक्षक व ५ हवालदार सेवेत आहे. म्हार्दोळ पोलीस स्थान‍क सुरू झाल्यापासून फोंडा पोलीस स्थानकातील कित्येक कर्मचाऱ्यांनी त्या पोलीस स्थानकात आपली बदली करून घेतली आहे. त्यामुळे फोंडा पोलीस स्थानकात अपुरा कर्मचारी वर्ग दिसून येत आहे.
फोंडा पोलीस स्थानकात कामाचा ताण
फोंडा पोलीस स्थानकात काम करण्यासाठी एकेवेळी उपनिरीक्षक व हवालदार बदली करून घेत होते. पण, गेल्या १-२ वर्षांपासून कामाचा ताण वाढल्याने फोंडा पोलीस स्थानकात बदली करून घेण्याचे धाडस कुणीच करीत नाही. त्यामुळे फोंडा पोलीस स्थानकात सध्या असलेल्या अधिकाऱ्यांसह इतर कर्मचाऱ्यांना अधिक काम करावे लागत असल्याचे दिसून येते. लवकरच कुळे पोलीस स्थानकात बदली झालेला एक उपनिरीक्षक येथे रूजू होणार आहे. तर फोंडा पोलीस स्थानकातून बदली झालेले एक उपनिरीक्षक म्हार्दोळ पोलीस स्थानकात ताबा घेणार आहे. त्यामुळे फोंडा पोलीस स्थानकाची उपनिरीक्षकांची संख्या आणखी कमी होणार आहे.