आपचे खासदार राघव चड्ढा यांचे संसद सदस्यत्व बहाल

पुन्हा दिसणार राज्यसभेत : चढ्ढा यांनी व्यक्त केला आनंद

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
04th December 2023, 05:27 pm
आपचे खासदार राघव चड्ढा यांचे संसद सदस्यत्व बहाल

नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार राघव चढ्ढा यांचे संसद सदस्यत्व बहाल करण्यात आले आहे. त्यांचे निलंबन राज्यसभेने मागे घेतले असून, राज्यसभेने यासंदर्भात ठराव मंजूर केला आहे. निवड समितीमध्ये त्यांची नावे समाविष्ट करण्यापूर्वी राज्यसभेच्या पाच खासदारांची संमती न घेतल्याने चड्ढा यांना ऑगस्टमध्ये निलंबित करण्यात आले होते. आपल्या निलंबनाविरोधात चढ्ढा सर्वोच्च न्यायालयात गेले होते.
संसदेत सोमवारपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली. चड्ढा यांचे निलंबन मागे घेण्याचा प्रस्ताव राज्यसभेत मंजूर करण्यात आला. याप्रकरणी सोमवारी राज्यसभेच्या विशेषाधिकार समितीची बैठक झाली. बैठकीनंतर राज्यसभेच्या सभापतींनी चढ्ढा यांचे सदस्यत्व बहाल करण्याचा निर्णय घेतला. आप खासदार राघव चढ्ढा म्हणाले, 'मला ११ ऑगस्ट रोजी राज्यसभेतून निलंबित करण्यात आले होते. माझे निलंबन मागे घेण्यासाठी मी सुप्रीम कोर्टात गेलो. सर्वोच्च न्यायालयाने त्याची दखल घेतली आणि आता ११५ दिवसांनी माझे निलंबन मागे घेण्यात आले आहे. माझे निलंबन मागे घेण्यात आले, याचा मला आनंद आहे आणि मला सर्वोच्च न्यायालय आणि राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांचे आभार मानायचे आहेत.
का निलंबित करण्यात आले?
ऑगस्टमध्ये दिल्ली सेवा विधेयकाशी संबंधित प्रस्तावावर चर्चा सुरू होती. यावेळी चढ्ढा यांच्यावर पाच खासदारांच्या खोट्या सह्या केल्याचा आरोप होता. खासदारांच्या संमतीशिवाय प्रस्तावावर नावे घेतल्याने त्यांना राज्यसभेतून निलंबित करण्यात आले होते. या प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत त्यांना निलंबित करण्यात आले होते. चढ्ढा यांच्या निलंबनाचा प्रस्ताव भाजप खासदार पियुष गोयल यांनी मांडला होता.

हेही वाचा