olx वर ऑडी विक्रीच्या नावे ६.३० लाखांचा गंडा; कळंगुटमध्ये गॅरेज मालकासह एकावर गुन्हा नोंद

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
04th December 2023, 04:03 pm
olx वर ऑडी विक्रीच्या नावे ६.३० लाखांचा गंडा; कळंगुटमध्ये गॅरेज मालकासह एकावर गुन्हा नोंद

म्हापसा : olx या एपद्वारे भलत्याचीच ऑडी कार विकण्याचे भासवून मेरशी येथील एका व्यक्तीला ६.३० लाखांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी कळंगुट पोलिसांनी शेल्डन फ्रन्क वाझ (अंधेरी-मुंबई) व ‘ऑटो झोन’ गॅरेजचा मालक रोहनकुमार कुलकर्णी  (कळंगुट) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

फसवणुकीचा हा प्रकार २ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर २०२३ या कालावधीत घडला आहे. या प्रकरणी तक्रारदार एडविन लॉरेन्स (मेरशी) यांनी कळंगुट पोलिसांत तक्रार दिली आहे. संशयित आरोपी शेल्डन वाझ याने olx  वर जीजे-05जेएच-8899 क्रमांकाची ऑडी क्यू 3 ही कार विकायची आहे, असा पोस्ट घातला होता. त्यानुसार लॉरेन्स यांने संशयिताशी संपर्क साधला. कार कळंगुट येथील ऑटो झोन गॅरेजमध्ये होती. या कारसाठी लॉरेन्सनी संशयितांना ६ लाख ३० हजार रुपये देऊन ती कार खरेदी केली. पण, नंतर संशयितांनी आश्वासन देऊनही कार लॉरेन्स यांच्या नावे हस्तांतरित केली नाही. तसेच ही कार संशयितांच्या नावावर नसल्याचे लॉरेन्स यांना आढळून आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच लॉरेन्स यांनी कळंगुट पोलिसांतच तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी दोन्ही संशयितांविरुद्ध भा.दं.सं.च्या ४२० व ३४ कलमाअंतर्गत गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक परेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अक्षय पार्सेकर करीत आहेत.