मिझोराममध्ये ZPM चा २७ जागांवर विजय! लालदुहोमा राज्यपालांकडे करणार सत्ता स्थापनेचा दावा

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
04th December 2023, 03:39 pm
मिझोराममध्ये ZPM चा २७ जागांवर विजय! लालदुहोमा राज्यपालांकडे करणार सत्ता स्थापनेचा दावा

आयझॉल : मिझोरममध्ये सकाळपासून सुरू असलेली मतमोजणी जवळजवळ पूर्ण झाली असून, या निवडणुकीत झोराम पीपल्स मुव्हमेंट (ZPM) पक्षाने २७ जागा‌ जिंकत सत्ताधारी नॅशनल फ्रंटचा (MNF) दारुण पराभव केला आहे. MNF ला केवळ १० जागांवर समाधान मानावे लागले आहे. दुसरीकडे तीन राज्यांत बहुमत मिळवलेल्या भाजपला अवघ्या दोन जागा जिंकता आल्या आहेत. तर, काँग्रेसला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले आहे.

झोराम पीपल्स मुव्हमेंट पक्षाचे सर्वेसर्वा लालदुहोमा यांनी चमकदार कामगिरी करत प्रचंड बहुमत मिळवले आहे. त्यामुळे त्यांच्या मुख्यमंत्री पदाचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, ‘मी उद्या किंवा परवा राज्यपालांना भेटेन. या महिन्यात नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे’, असे त्यांनी म्हटले आहे. तर, पक्षाचे उपाध्यक्ष डॉ. केनेथ चव्हांगलियाना यांनी या निकालानंतर जनतेचे आभार मानले आहेत.

मिझोराममध्ये उपमुख्यमंत्री तवान्लुइया तुईचांग यांच्या मतदारसंघात ZPM चे उमेदवार डब्ल्यू चुआनावामा यांनी बाजी मारली आहे. ९०९ मतांच्या फरकाने त्यांनी उपमुख्यमंत्र्यांना पराभूत केले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री झोरमथांगा यांच्या ऐझॉल पूर्व-१ मतदारसंघात ZPM चे उमेदवार लालथनसांगा यांनी बाजी मारली आहे. त्यांनी झोरमथंगा यांचा पराभव केला आहे.

दरम्यान, दहा वर्षे सत्तेत असलेल्या काँग्रेसला २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत सरकार गमवावे लागले होते. पी. ललथनहवला चांफई दक्षिण आणि सेरछिप या दोन्ही जागांवरून निवडणूक हरले होते. MNF थेट लढतीत काँग्रेसचा पराभव केला. झोरमथांगा मुख्यमंत्री झाले. त्यानंतर एमएनएफला २६, काँग्रेसला ५, भाजपला १ आणि अपक्षांना ८ जागा मिळाल्या होत्या. यावेळेस भाजपला दोन जागांवर बहुमत मिळाले आहे.

हेही वाचा