चेन्नईत ‘मिचॉन्ग’ चक्रीवादळाचा कहर;आता पूर्व-दक्षिण किनारपट्टी कवेत घेण्याच्या तयारीत

मुसळधार पावसामुळे जलमय झालेल्या रस्त्यांवर पोहतायत चक्क मगरी !

Story: वेब डेस्क | गोवन वार्ता |
04th December 2023, 03:13 pm
चेन्नईत ‘मिचॉन्ग’ चक्रीवादळाचा कहर;आता पूर्व-दक्षिण किनारपट्टी कवेत घेण्याच्या तयारीत

चेन्नई:  बंगालच्या उपसागरात ‘मिचॉन्ग’ चक्रीवादळामुळे तामिळनाडूच्या अनेक भागात मुसळधार पाऊस पडत आहे, त्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. विशेषत: चेन्नईमध्ये या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी रस्ते जलमय झाले असून अनेक तास वीजपुरवठा खंडित झाला होता. मिचॉन्ग चक्रीवादळ सध्या बंगालच्या उपसागरात उग्र रूप धारण करत असून ते आंध्र किनारपट्टीकडे वेगाने सरकत आहे. हे चक्रीवादळ मंगळवारी दुपारी नेल्लोर आणि मछलीपट्टणम दरम्यान धडकण्याची शक्यता आहे.


चक्रीवादळामुळे झालेल्या मुसळधार पावसाने तामिळनाडूमध्ये हाहाकार माजवला आहे. चेन्नई, चेंगलपट्टू, कांचीपुरम, नागापट्टिनम, कुड्डालोर आणि तिरुवल्लूर जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला आहे. त्यामुळे चेन्नईतील बहुतांश भाग पाण्यात बुडाला आहे, तर सखल भागात मोठ्या प्रमाणात पूरस्थिती निर्माण झाली आहे. शहरातील बर्‍याच भागांत वीज पुरवठा खंडित झाला होता. तसेच इंटरनेट व्यत्ययांचाही सामना करावा लागला, ज्यामुळे लोकांना सुरक्षित राहण्याचे मार्ग शोधण्यास भाग पाडले. 


दुसरीकडे या मुसळधार पावसामुळे रेल्वे आणि हवाई सेवेवरही मोठा परिणाम झाला आहे. अनेक उड्डाणे आणि गाड्या रद्द कराव्या लागल्या असून त्यांचे मार्ग बदलले आहेत. चेन्नई विमानतळाचे कामकाज सकाळी ९.३० ते ११.४० पर्यंत बंद ठेवण्यात आले होते. सततच्या पावसामुळे विमानतळावर येणारी आणि जाणारी सुमारे ७० उड्डाणे रद्द करण्यात आली. धावपट्टी आणि डांबरी मार्गही बंद असल्याचे सूत्रांनी सांगितले.


सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, त्यामुळे लोकांमध्ये घबराट पसरली आहे. यामध्ये रात्रीच्या वेळी शहरातील रस्त्यांवर मगर फिरताना दिसत आहे.