४ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत किती टक्के लोकांनी निवडला 'नोटा'चा पर्याय; जाणून घ्या

नोटाचा पर्यायाचा छत्तीसगढमध्ये सर्वाधिक अवलंब केला गेला

Story: वेब डेस्क | गोवन वार्ता |
04th December 2023, 03:06 pm
४ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत किती टक्के लोकांनी निवडला 'नोटा'चा पर्याय; जाणून घ्या

नवी दिल्ली :  ४ राज्यांतील निवडणुकांचे निकाल काल जाहीर झाले, तर आज मिजोरामचे निकाल जाहीर होतील. भाजपने राजस्थान, छत्तीसगढ आणि मध्यप्रदेशात आपला झेंडा फडकवला. तर तेलंगणा कॉंग्रेसच्या ताब्यात गेला. सहसा निवडणुका पार पडल्यावर किती टक्के लोकांनी 'NOTA' अर्थात 'वरीलपैकी एकही नाही' पर्याय निवडला याबद्दल चर्चा रंगतेच.

चार राज्यांत मतमोजणी झाली, त्यातून नोटाशी निगडीत आकडेवारीही समोर आली आहे. यापैकी तीन राज्यांमध्ये एक टक्‍क्‍यांहून कमी मतदारांनी 'नोटा'चा पर्याय निवडला आहे. निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवरून ही माहिती मिळाली आहे.


कोणत्या राज्यात किती टक्के नोटाचा वापर करण्यात आला ?

मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि तेलंगणामधील मतमोजणी रविवारी पार पडली, तर मिझोराममध्ये सोमवारी मतमोजणी होत आहे. मध्य प्रदेशातील ७७.१५ टक्के मतदानापैकी ०.९८ टक्के मतदारांनी ‘नोटा’चा पर्याय निवडला. शेजारील राज्य छत्तीसगडमध्ये सर्वाधिक १.२६ टक्के मतदारांनी EVM वर 'NOTA' बटण दाबले. तेलंगणामध्ये०.७३ टक्के मतदारांनी 'नोटा'चा पर्याय निवडला. राज्यात ७१.१४ टक्के मतदान झाले. त्याचप्रमाणे राजस्थानमध्ये ०.९६ टक्के मतदारांनी 'नोटा'चा पर्याय निवडला. राज्यात ७४.६२ टक्के मतदान झाले. 

हेही वाचा