आयपीएल २०२४चा १९ रोजी दुबईत लिलाव

आयपीएच्या इतिहासात प्रथमच परदेशात लिलावाचे आयोजन

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
03rd December 2023, 11:52 pm
आयपीएल २०२४चा १९ रोजी दुबईत लिलाव

मुंबई : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)चा लिलाव १९ डिसेंबर रोजी दुबईत होणार आहे. आयपीएलचा लिलाव देशाबाहेर होण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे. आयपीएल प्रशासनाने सोशल मीडियावर याबाबतची माहिती दिली. दरम्यान, या लिलावासाठी एकूण ११६६ खेळाडूंनी नाव दिली आहेत. यामधील ७७ खेळाडूंवर फ्रँचायझी २६२.९५ कोटींची बोली लावणार आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा संघांकडे खेळाडू खरेदीसाठी ५ कोटी रुपये जास्त आहेत.
यंदाच्या लिलावामध्ये दिग्गज खेळाडू आहेत ज्यांना कोणते संघ घेण्यात यशस्वी ठरतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. या लिलावामध्ये ६१ खेळाडूंनी आपली बेस प्राईज ही करोडोंमध्ये ठेवली आहे. यामधील २५ खेळाडूंनी आपली बेस प्राईज ही २ कोटी ठेवली आहे. दक्षिण आफ्रिकेचा नवा वेगवान गोलंदाज गेराल्ड कोएत्झी आणि धोकादायक फलंदाज रॅसी व्हॅन डर डुसेन यांचाही २ कोटींमध्ये समावेश आहे. जगातील अव्वल फिरकीपटूंपैकी वानिंदू हसरंगा दीड कोटी आहे. त्याला रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने सोडले आहे.
२५ खेळाडूंची मूळ किंमत २ कोटी रुपये
लिलावात २५ खेळाडूंची मूळ किंमत २ कोटी रुपये असून यामध्ये ऑस्ट्रेलियाचे ७ आणि भारताचे ४ खेळाडू आहेत. ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्स, ट्रॅव्हिस हेड, मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड, स्टीव्ह स्मिथ, जोश इंग्लिस आणि शॉन अॅबॉट यांची मूळ किंमत २ कोटी रुपये आहे. तर भारतीयांमध्ये हर्षल पटेल, केदार जाधव, शार्दुल ठाकूर आणि उमेश यादव यांच्या मूळ किमती सर्वाधिक आहेत. याशिवाय २० खेळाडूंची बोली १.५० कोटी रुपयांपासून सुरू होईल आणि १६ खेळाडूंची बोली १ कोटी रुपयांपासून सुरू होईल. उर्वरित ११०५ खेळाडूंची मूळ किंमत २० ते ९५ लाख रुपये राहील. 

आयपीएल लिलावासाठी नोंदणी करण्यात आलेल्या खेळाडूंमध्ये ८३० भारतीय आणि ३३६ परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने परदेशी खेळाडूंच्या यादीमध्ये आपले नाव दिलेले नाही. मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स, ट्रॅव्हिस हेड, जेराल्ड कुटीज आणि रचिन रवींद्र यांसारखे मोठे विदेशी खेळाडू या आयपीएल लिलावात उतरणार आहेत. तर भारतीय खेळाडूंमध्ये हर्षल पटेल, शार्दुल ठाकूर, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट यांच्या नावांचा समावेश आहे. त्यांची किंमत १० कोटींच्या पुढे जाऊ शकते.