सुदेश नाईक म्हणाले, बाबूश मोन्सेरात यांच्या घरात काहीच सापडले नाही

पणजी पोलीस ठाणे हल्लाप्रकरण : पुढील सुनावणी १३ डिसेंबरला

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
01st December 2023, 11:52 pm
सुदेश नाईक म्हणाले, बाबूश मोन्सेरात यांच्या घरात काहीच सापडले नाही

मडगाव : पणजी पोलीस स्थानक हल्लाप्रकरणी शुक्रवारी तत्कालीन पोलीस निरीक्षक सुदेश नाईक यांची उलटतपासणी करण्यात आली. यावेळी वकिलांनी मोन्सेरात य‍ांच्या घराची झाडाझडती घेतल्याबाबत विचारणा केली असता, पाहणी केली होती, पण काही मिळाले नसल्याचे नाईक यांनी स्पष्ट केले. याप्रकरणी पुढील सुनावणी १३ डिसेंबर रोजी २.३० वा. होणार आहे.

मंत्री बाबूश मोन्सेरात यांच्यासह इतरांविरोधात पणजी पोलीस स्थानकावर हल्लाप्रकरणी सुनावणी दक्षिण गोवा जिल्हा विशेष न्यायालयात सुरू आहे. बाबूश मोन्सेरात व त्यांच्या समर्थकांनी १९ फेब्रुवारी २००८ मध्ये पणजी पोलीस ठाण्यावर हल्ला केल्याप्रकरणी यापूर्वी सुनावणीवेळी तत्कालिन पोलीस निरीक्षक नाईक यांची साक्ष नोंदवण्यात आली. बाबूश यांना ३१ डिसेंबरपर्यंत सुनावणीला अनुपस्थित राहण्याची परवानगी दिली आहे. शुक्रवारी झालेल्या सुनावणीवेळी संशयितांपैकी २५ जण उपस्थित होते. तर बाबूश, जेनिफरसह ९ जण अनुपस्थित होते. पणजीचे तत्कालीन पोलीस निरीक्षक सुदेश नाईक यांची अॅड. अफोन्सो यांच्याकडून होणारी उलटतपासणी पूर्ण झाली नव्हती. वकील अफोन्सो यांनी यावेळी ती पूर्ण केली. त्यानंतर टोनी रॉड्रिग्ज यांचे वकील अॅड. सुरेंद्र देसाई यांच्याकडून नाईक यांची उलटतपासणी सुरू झाली. उलटतपासणी करताना वकिलांकडून हल्ल्याच्या घटनेनंतर बाबूश व जेनिफर यांच्या घराची तपासणी करण्यात आलेली का, असा प्रश्न केला असता घराची झाडाझडती घेतली पण काहीच मिळाले नसल्याचे स्पष्ट केले.