'नेपोलियन'च्या भूमिकेत जोकिनची 'फिनिक्स' भरारी

दिग्दर्शक रिडले स्कॉटने सगळे कसब लावले पणाला; चित्रपट पाहण्यापूर्वी इतिहासात डोकावणे आवश्यक

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
26th November 2023, 11:05 am
'नेपोलियन'च्या भूमिकेत जोकिनची 'फिनिक्स' भरारी

'नेपोलियन' या चित्रपटात फ्रेंच नेत्याचा सत्तेचा उदय तसेच सम्राज्ञी जोसेफिनशी असलेले त्याचे ऋणानुबंध दाखवण्यात आले आहे. या चित्रपटात जोकिन फिनिक्स नेपोलियनची भूमिका साकारत आहे आणि नेपोलियनची पत्नी जोसेफिनची भूमिका व्हेनेसा किर्बीने साकारली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रिडले स्कॉट यांनी केले असून चित्रपटाची कथा डेव्हिड स्कार्पा यांनी लिहिली आहे. अभिनेता जोकिन फिनिक्स अशाच धीरगंभीर आणि अभिनय शैलीला आव्हान देणाऱ्या भूमिका वठवण्यासाठी ओळखला जातो. तर, रिडले स्कॉट यांचा पिरीयड ड्रामा बनवण्यात मोठा हातखंडा आहे. एक्सॉड्स, प्रोमेथीयस, हॅनिबेल आणि किंगडम ऑफ हेवन सारख्या अतुल्य चित्रपटांची ठेव देत त्यांनी हॉलिवूड चित्रपट सृष्टीत स्वतःची वेगळी जागा निर्माण केली आहे. बऱ्याचदा त्यांचे प्रयोग बॅकफायर देखील होतात जसे की १४९२ : कंक्वेस्ट ऑफ हेवन. चला तर नेपोलियनच्या कथानकात किती दम आहे याचा आढावा घेऊया.....



पिरीयड ड्रामा हा अनेक सिनेरसिकांचा जिव्हाळ्याचा विषय. अनेक पात्र, गोष्टी, त्याकाळातल्या घटनांचे विवेचन आपण पुस्तके आणि कादंबऱ्यात वाचतो. पण बऱ्याचदा जेव्हा कोणताही दिग्दर्शक मग तो कितीही कर्तबगार असो, एखादा कालखंड २-३ तासांत मांडताना घामाघूम होतोच. रिडले स्कॉटच्या नेपोलियनचेही काहीसे तसेच झाले आहे. 'नेपोलियन' चित्रपटाची सुरुवात मेरी अँटोइनेटच्या शिरच्छेदाने होते, या घटनेचा नेपोलियन बोनापार्ट अनौपचारिकपणे साक्षीदार होता. या चित्रपटात बोनापार्टचा तोफखान्याचा सेनापती ते नेपोलियन द ग्रेट, फ्रान्सचा सम्राट होण्यापर्यंतचा प्रवास दाखवण्यात आला आहे. संपूर्ण जग जिंकण्याची क्षमता त्याच्यात आहे आणि अवघ्या पंधरा वर्षांत तो फ्रान्सचा सम्राट बनतो. सत्तेवर असलेले लोक नेपोलियनला उच्च पदासाठी योग्य मानत नाहीत. पण, तो अलेक्झांडर आणि सीझरच्या पावलावर पाऊल ठेवून आपले स्वप्न पूर्ण करतो. असा चित्रपटाचा पूर्वार्ध आहे. हा चित्रपट नेपोलियनच्या कारकिर्दीचा एक अद्भूत प्रवास दाखवतो. पण नेपोलियनच्या आयुष्यातील अनेक पैलूंकडे चित्रपटात दुर्लक्ष करण्यात आले आहे.



नेपोलियनबद्दल जाणून घ्यायचे असेल तर या चित्रपटापेक्षा अधिक माहिती इंटरनेटवर उपलब्ध आहे. चित्रपटाची सुरुवात मेरी अँटोइनेटच्या शिरच्छेदाने होते. मेरी अँटोनेट कोण आहे, तिचा शिरच्छेद का केला जातो. शिरच्छेद करण्यापूर्वी तिथले लोक त्याचा खूप तिरस्कार करतात हे दाखवण्यात आले आहे, मात्र यामागचे कारण चित्रपटात स्पष्ट झालेले नाही. नेपोलियनने आपल्या आयुष्यात २१ युद्धे लढली, त्यापैकी सहा युद्धांचा उल्लेख या चित्रपटात आहे. पण हा चित्रपट पाहिल्यानंतर हे समजत नाही की नेपोलियन कोणती विशिष्ट लढाई का लढत आहे किंवा कोणत्या विशिष्ट करारावर स्वाक्षरी करत आहे. रीडले स्कॉट यांनी नेपोलियनच्या रणनीती आणि त्यांच्या मानसशास्त्राविषयी खूप अभ्यास करून हा चित्रपट बनवला आहे. एखादा माणूस आपल्या महत्वकांक्षेच्या जोरावर काय करू शकतो याचेच उदाहरण जोकिन फिनिक्स याने निभावलेल्या नेपोलियनच्या भूमिकेतून आपल्याला दिसून येते.



चित्रपटातील युद्धाची दृश्ये खूपच प्रेक्षणीय आहेत. पण चित्रपटातील बहुतांश दृश्ये बर्फ आणि धुक्यात अशा प्रकारे चित्रित करण्यात आली आहेत की कोण जिंकत आहे आणि का? हे कळण्यास वाव नाही. नेपोलियन अचानक रणांगणात तर मध्येच चर्च आणि राजवाड्यांमध्ये दाखवला जातो. चित्रपट पाहिल्यानंतर असे दिसते की हा चित्रपट डॉक्युमेंटरी स्वरूपात चित्रित केला गेला आहे आणि सर्व दृश्यांना जोडून कथा निवेदकाच्या माध्यमातून पुढे नेण्यात आली आहे. दिग्दर्शकाच्या शैलीस अनुसरून विचार केल्यास चित्रपट प्रेक्षकांना फास्ट फोरवर्ड फॉर्मेटमध्ये शूट केल्यासारखाही वाटू शकतो. कारण चित्रपटातील दृश्यांमध्ये समन्वय नाही.

चित्रपटाची कथा सुरुवातीपासून बिट्स अँड पिसेसमध्ये सांधली गेली असून, शेवटपर्यंत हरवलेली दिसते.दोन तास ४० मिनिटांच्या चित्रपटात नेपोलियनचा संपूर्ण जीवनप्रवास दाखवणे अवघड आहे, पण चित्रपटाच्या सुरुवातीला नेपोलियनचे पात्र प्रेक्षकांना समजेल अशा पद्धतीने नेपोलियनचे पात्र मांडणे आवश्यक होते. नेपोलियनची व्यक्तिरेखा आधी वाचून मगच चित्रपट पाहिला तरच हा चित्रपट पाहणे सुखकर ठरणार आहे. चित्रपटाची अजून एक चांगली गोष्ट म्हणजे चित्रपटाची छायांकनाची. सिनेमॅटोग्राफर डॅरियस वोल्स्कीने ही युद्ध दृश्ये अतिशय सुंदरपणे चित्रित केली आहेत.
इतिहासातील पात्रांच्या मानसीकतेची अनुभूती घ्यायची असेल हा चित्रपट जरूर पहा. मग कधी पाहताय?‍‍



चित्रपट : नेपोलियन (पिरीयड ड्रामा)
कलाकार : जोकिन फिनिक्स, व्हेनेसा किर्बी, तहर रहीम, रुपर्ट एव्हरेट आणि मार्क बोनर
लेखक : डेव्हिड स्कार्पा
दिग्दर्शक : रिडले स्कॉट
निर्माता : रिडले स्कॉट, केविन जे. वॉल्श, मार्क हफम आणि जोकिन फिनिक्स
प्रदर्शनाची तारीख : २२ नोव्हेंबर २०२३