माणूस म्हणून चांगले असाल, तरच चांगले कलाकार व्हाल!

मनोज वाजपेयी : शिकण्याची प्रक्रिया सोडून चालणार नाही

Story: पिनाक कल्लोळी । गोवन वार्ता |
25th November 2023, 12:41 am
माणूस म्हणून चांगले असाल, तरच चांगले कलाकार व्हाल!

पणजी : चांगला अभिनेता होण्यासाठी आधी चांगली व्यक्ती होणे गरजेचे आहे. अभिनेता एक माणूस म्हणून चांगला असेल, तरच तो इतर माणसांच्या भावना समजावून घेऊन त्या पात्रात आणू शकतो, असे मत अभिनेता मनोज वाजपेयी यांनी व्यक्त केले. इफ्फीच्या ‘इन कॉन्व्हर्सेशन’ या सत्रात ते बोलत होते. यावेळी अभिनेता श्रीकृष्ण दयाल, दिग्दर्शक राज आणि डीके तसेच अपूर्वा बक्षी उपस्थित होते.
मनोज वाजपेयी म्हणाले की, अभिनेत्याला त्याच्या पात्राच्या भावभावना, तो कोणत्या परिस्थितीतून गेला आहे, त्याची मानसिक स्थिती काय आहे? हे समजून घेणे आवश्यक आहे. त्याने त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या माणसांचे निरीक्षण करणेदेखील गरजेचे असते. माझ्याशी बोलणारा, माझ्या बाजूला उभा राहिलेला, माझ्या पुढून चालत जाणारा माणूस काय करतो, याचे निरीक्षण करावे लागते. अभिनय करियर हे मला यासाठी आवडते. यामुळे मला माणसांची निरीक्षण करण्याची संधी मिळते.
ते म्हणाले, कलाकारांनी आधी शिकलेल्या सर्व गोष्टी करणे विसरणे आवश्यक असते. याला ‘अनलर्निंग’ असेही म्हणतात. एखाद्या चित्रपटाच्या चित्रिकरण जाताना मी आधी खूप तयारी करून जात असे. मात्र अति तयारी केल्यामुळे माझ्यातील शिकण्याची प्रक्रियाच बंद झाली होती. अशा वेळी दिग्दर्शकाने काही नवीन गोष्टी सांगितल्या, तर त्या मला सहसा पटत नसत. यामुळे अनेकदा वादावादीही झाली आहे. मात्र काही दिवसांनी मला जाणीव झाली की आपली ही गोष्ट चुकत आहे. यानंतर मी रिहर्सलवर जास्त भर देत तयारी करून आलेल्या गोष्टी विसरण्यास शिकलो .

ओटीटी माध्यमांनी इंडिपेंडेंट चित्रपटांना संधी द्यावी!
जेव्हा भारतात ओटीपी माध्यम सुरू झाले, तेव्हा त्यांनी इंडिपेंडेंट चित्रपटांना संधी दिली होती. यामुळे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या परंतु बिग बजेट नसणाऱ्या चित्रपटांना मोठे माध्यम मिळाले होते. मात्र गेल्या काही वर्षांत ओटीटी माध्यमांनी इंडिपेंडेंट चित्रपटांना स्थान देणे बंद केले आहे. विविध प्रकारच्या चित्रपटांना संधी द्यावी लागेल, असे वाजपेयी म्हणाले.

‘सत्या’नंतरचा काळ कठीण!
वाजपेयी यांनी सांगितले की, दिल्लीत अभिनयाचे शिक्षण पूर्ण करून झाल्यावर मी मुंबईत गेलो. सुरुवातीचा काळ खूप कठीण होता. ‘सत्या’ चित्रपटानंतर परिस्थिती बदलेल असे वाटले होते, मात्र तसे झाले नाही. यानंतर पुढील चार ते पाच वर्षे मी खूप नैराश्यात होतो. मात्र मी धीर न सोडता विविध गोष्टी करत राहिले. कधी तरी चांगली संधी येईल, ही आशा माझ्या मनात होती.

‘फॅमिलीमॅन’साठी २० मिनिटांत तयार झालो!
पूर्वी मला वेबसीरीज म्हणजे सेक्स, व्हायलंस अँड गन हेच आहे असे वाटत होते. मी ज्या काही वेबसीरीज बघितल्या होत्या, त्यामध्ये तरी निदान असाच आशय होता. त्यामुळे वेबसीरीज करायच्या नाहीत, असे माझे मत झाले होते. मात्र ‘फॅमिलीमॅन’चे दिग्दर्शक राज आणि डीके यांनी केवळ २० मिनिटांत माझे पात्र, पटकथा समजावून सांगितली. त्यांचे ऐकूनच मी ‘फॅमिलीमॅन’ करण्यासाठी तयार झालो, असे वाजपेयी यांनी सांगितले.