आशेचा किरण... बाेगद्यात अडकलेल्या मजुरांचा व्हिडिओ समोर

सर्व जण सुखरुप : १० दिवसांपासूनच्या बचावकार्याला यश मिळण्याची शक्यता

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
22nd November 2023, 12:16 am
आशेचा किरण... बाेगद्यात अडकलेल्या मजुरांचा व्हिडिओ समोर

उत्तरकाशी : उत्तराखंडमधील उत्तरकाशीतल्या सिल्क्यारा बोगद्यात गेल्या १० दिवसांपासून अडकलेल्या ४१ कामगारांना बाहेर काढण्यासाठी प्रशासन आणि बचाव पथकाचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. अशातच आशेचा किरण दिसला असून हे सर्व कामगार सुखरुप असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. त्यामुळे बचावपथकाच्या प्रयत्नांना नजिकच्या काळात यश मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. बचाव पथकाने मजुरांपर्यंत एका पाईपद्वारे अन्न पोहोचवण्याचे काम सुरू केले आहे. याच पाईपमधून त्यांच्यापर्यंत कॅमेरा पोहोचवण्यात आला.


कामगारांपर्यंत पोहोचण्यासाठी बोगद्यावरील टेकडीला उभा छेद देऊन ‘प्रवेश मार्ग’ तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले. मात्र त्यात यश आले नाही. मजुरांपर्यंत अन्न आणि पाणी पोहोचविण्यासाठी सहा इंची पाईप टाकण्यात आला आहे. या पाईपच्या मदतीने मजुरांपर्यंत खिचडी आणि पाणी पोहोचवण्यात आले. तसेच कॅमेऱ्याच्या सहाय्याने बोगद्यातील परिस्थिती पाहता आली. आतमध्ये लाईटची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर आतमध्ये अडकलेल्या मजुरांनी सुरक्षा हेल्मेट घातल्याच व्हिडिओत पाहायला मिळाले.


कामगारांना औषधे, सुका मेवाही...
कामगारांना भात, भाकरी, भाजी यांचा पुरवठा करण्यासाठी ढिगाऱ्यातून मोठ्या व्यासाचा पाईप टाकण्यात आला आहे. तसेच विविध जीवनसत्वे, नैराश्यावरील औषधे आणि सुका मेवाही पुरवला जात आहे, अशी माहिती रस्ते वाहतूक मंत्रालयाचे सचिव अनुराग जैन यांनी दिली.

नातेवाईकांनी साधला संवाद
बोगद्यात अडकलेल्या मजुरांच्या नातेवाईकांना पाईपमधून त्यांच्याशी बोलण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यानंतर उत्तर प्रदेशातून आलेल्या दोघांनी त्यांच्या नातेवाईक मजुरांशी संवाद साधला. ‘माझा पुतण्या आत अडकला आहे, मी त्याच्याशी बोललो. तो म्हणाला की तो ठीक आहे,’ अशी माहिती शत्रुघ्न लाल यांनी दिली. लखिमपूर खेरी येथून आलेल्या एका मजुराच्या वडिलांनीही त्यांच्या मुलाचा आवाज ऐकता आल्याबद्दल आनंद व्यक्त केला.

हेही वाचा