फ्राईड राईस, शिळा भात खाणाऱ्यांनो सावध व्हा! नाहीतर जीव गमवाल...

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
21st November, 01:28 pm
फ्राईड राईस, शिळा भात खाणाऱ्यांनो सावध व्हा! नाहीतर जीव गमवाल...

पणजी : ‘पोट हे सर्व आजारांचे मूळ आहे. म्हणूनच शिळे अन्न खाऊ नये’, असे आयुर्वेदाने वारंवार ठासून सांगितले आहे. पण, धावपळीच्या जीवनशैलीत वेळ वाचवण्यासाठी शिळे अन्न खाल्ले जाते किंवा फास्ट फुडच्या चटपटीत गाड्यावर चटकन बनणारे फ्राईड राईस सारखे चायनिज पदार्थ बकाबक तोंडात कोंबले जातात. पण, हेच अन्न जीवावर बेतण्याची शक्यता असल्याचे नुकतेच संशोधनातून समोर आले आहे.

अन्न गरम केल्याने त्यातील बॅक्टेरिया नष्ट होतात, असा समज सर्वसामान्य लोकांमध्ये आहे. पण, तो पूर्णपणे चुकीचा आहे. विशेषतः भाताबद्दल तर ते लागूच होते. कोणत्याही स्टार्चयुक्त पदार्थात उष्णता प्रतिरोधक गुण हे असतातच. भातात तर ८० टक्के स्टार्च आहेत. असे अन्न खाल्ल्यामुळे ‘फ्राइड राईस सिंड्रॉम’ होण्याचा धोका वाढत असल्याचे संशोधकांना आढळून आले आहे.


काय आहे 'फ्राइड राईस सिंड्रॉम'

अनेक वेळा रात्री उरलेला भात आपण बाहेरच ठेवतो, तेव्हा त्यात विविध प्रकारचे बॅक्टेरिया वाढू लागतात. भातामध्ये ‘बॅसिलस सेरियस’ नावाचे बॅक्टेरिया असतात जे अन्न दूषित करू शकतात आणि आपल्यात रोग निर्माण करू शकतात. ‘बॅसिलस सेरियस’ या सामान्य वातावरणात मोठ्या प्रमाणात आढळणाऱ्या विषाणूमुळे होणारा अन्नजन्य आजार ‘फ्राईड राइस सिंड्रोम’ला कारणीभूत ठरतो.

वैज्ञानिक दृष्ट्या ‘बॅसिलस सेरियस’ हा वातावरणात सर्वत्र असतोत. पण, स्टार्च आणि पिष्टमय पदार्थात याची जास्त पैदास होते. जसे की तांदूळ आणि गव्हापासून बनलेले पदार्थ. अशा गोष्टी पुन्हा गरम केल्याने त्यातील विष किंवा विषाणू नष्ट होत नाहीत, उलट ते तुम्हाला आजारी बनवू शकतात.


शिळे अन्न खाल्याने गमावले प्राण

‘फ्राईड राइस सिंड्रोम’ या शब्दाचा वापर बेल्जियममध्ये २००८ मध्ये पहिल्यांदा नोंदवला गेला. पाच दिवस शिळा भात खाल्ल्याने तेथे २० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. या तरुणाचे नाव एजे असून तो बेल्जियमच्या ब्रसेल्सचा रहिवासी होता. त्याने पास्ता तयार केला आणि बाहेरच झाकून ५ दिवस ठेवला. अचानक एके दिवशी, खेळायला जाण्यापूर्वी त्याने तोच पास्ता गरम करून खाल्ला. यानंतर काही वेळातच त्याला डोकेदुखी, मळमळ आणि पोटदुखीचा त्रास सुरू झाला. त्यानंतर तो मध्यरात्री उठला आणि पाणी पिऊन झोपी गेला. सकाळी त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले.

शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला. या तरुणाला आधीच ‘सेन्ट्रीलोब्युलर लिव्हर नेक्रोसिस’ नावाच्या आजाराने ग्रासले होते. त्यामुळे त्याच्या अवयवांनी हळूहळू काम करणे बंद केले होते. त्याचबरोबर पाच दिवस जुना पास्ता खराब झाल्यामुळे त्यात ‘बॅसिलस सेरियस’ नावाचे ‘बॅक्टेरिया’ वाढले होते, जे विषारी बनले आणि ते खाल्ल्याने त्याचा मृत्यू झाल्याचेही समोर आले.

‘फ्राइड राईस सिंड्रॉम’ची लक्षणे

१) अतिसार

२) डोकेदुखी

३) मळमळ / उलट्या

४) ताप

कसे टाळावे
कधीतरी गरज म्हणून साठवलेले अन्न खाल्ल्यानंतर आपल्याला विचित्र वाटते, परंतु आपण ते सामान्य असल्याचे समजून त्याकडे दुर्लक्ष करतो. असे करणे धोकादायक ठरू शकते. अशाचप्रकारे जर तुम्ही चायनिजच्या गाड्यावर फ्राईड राईस खाल्ला तरी हा त्रास होण्याची जास्त शक्यता असते. कारण, फ्राईड राईससाठी भात आधीच बनवून ठेवलेला असतो. आयुर्वेदानुसार ३ तासानंतर कोणतेही अन्न शिळे होते. म्हणजे, फ्राईड राईस हा काही तास आधी बनवून ठेवल्याने त्यातही विषाणू होण्याची शक्यता बळावते. असा भात खाणाऱ्यांनाही आजारपण येऊ शकते.

डॉक्टरांचा त्वरित सल्ला घ्या
तसे झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. डॉक्टर तुम्हाला तरल पदार्थ घेण्याचा सल्ला करतील. या स्थितीत शक्य तितके पाण्याचे सेवन करत राहावे. शिळे अन्न गरम करणे व खाणे टाळावे. तांदूळ खोलीच्या तपमानावर दोन तासांपेक्षा जास्त ठेवू नये. शक्यतो पावसात किंवा हिवाळ्यात उरलेले अन्न खाणे टाळावे. गरजेपूरतेच अन्न शिजवून त्याच वेळी खाल्ले की बऱ्याच त्रासांपासून वाचता येऊ शकते.

हेही वाचा