गांधी मार्केटमधील विक्रेत्यांचा चढला पारा... थेट मडगाव पालिकेवर काढला मोर्चा!

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
21st November, 12:03 pm
गांधी मार्केटमधील विक्रेत्यांचा चढला पारा... थेट मडगाव पालिकेवर काढला मोर्चा!

मडगाव : मार्केटबाहेर बेकायदेशीरपणे केला जाणारा व्यवसाय आणि जुन्या रेल्वे स्थानकाजवळ दर रविवारी चालवला जाणारा चोर बाजार, यांमुळे मार्केटमधील विक्रेत्यांच्या व्यवसायावर विपरीत परिणाम झाला आहे. हे दोन्ही प्रकार बंद करावेत आणि देखभाल दुरुस्तीची कामे त्वरित पूर्ण करावी, यांसह प्रलंबित मागण्यांची पूर्तता न झाल्याने संतापलेल्या ‘गांधी मार्केट फळ-भाजी आणि तयार कपडे विक्रेते संघटने’ने आज सकाळी मडगाव पालिकेवर धडक मोर्चा काढला.

संघटनेकडून यापूर्वी निवेदन सादर करत प्रलंबित असलेल्या मागण्यांवर १५ दिवसांच्या आत तोडगा काढण्याची मागणी केली होती. पण, पालिकेने दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवत माजी मंत्री बाबू आजगावकर, संघटनेचे नेते तथा माजी नगराध्यक्ष राजेंद्र आजगावकर यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. नगराध्यक्ष व मुख्याधिकारी उपस्थित नसल्याने आंदोलकांनी पालिकेच्या पायर्‍यांवर ठिय्या मांडला. त्यानंतर मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांच्यासोबत विक्रेत्यांची बैठकी झाली. त्यात विक्रेत्यांनी बेकायदा व्यवसाय करणाऱ्यांसह येथील चोरबाजार बंद करण्याची मागणी केली.

मडगाव पालिकेच्या मालकीच्या गांधी मार्केटमधील सोपोचे शुल्क संघटनेच्या सदस्यांकडून नियमित फेडले जाते. सुमारे ८० टक्के जागा हस्तांतरित झाल्या आहेत. काही सदस्यांनी सोपो जागा हस्तांतरित करण्याच्या परवानगीसाठी अर्ज केलेले आहेत. मात्र, आतापर्यंत त्यास प्रतिसाद मिळालेला नाही. त्यांना त्रास न देता जागा हस्तांतरण करावी, गांधी मार्केटमधील देखभाल दुरुस्तीच्या कामांकडे लक्ष द्यावे, अशी मागणीही विक्रेत्यांनी केली आहे.

दरम्यान, मोर्चाला माजी मंत्री बाबू आजगावकर यांनी संबोधित केले. गांधी मार्केटबाहेरील बेकायदेशीर वस्तू विक्री बंद करावी. मार्केटमध्ये कर्नाटक किंवा इतर राज्यांतील तांबडी भाजी विक्री करू नये. गोव्यात पिकवण्यात आलेल्या भाजीचीच विक्री करावी, असे आवाहन त्यांनी विक्रेत्यांना केले.

अशा आहेत विक्रेत्यांच्या मागण्या...

* गेल्या अनेक वर्षांपासून गांधी मार्केटमध्ये शेडसह ३२ व्यवसाय हातगाडेधारकांना करण्याची परवानगी मडगाव पालिकेने दिली आहे. परंतु, आजपर्यंत तेथे वीजपुरवठा दिलेला नाही. त्यांची गैरसोय दूर करावी.

* पालिकेजवळच्या कोमुनिदाद इमारतीसमोरील पदपथांवर अनेक बेकायदेशीर विक्रेते तयार कपडे व अन्य साहित्याची खुलेआम विक्री करताना दिसतात. पालिकेच्या कामकाजाच्या वेळेत ही विक्री सुरू असते. त्यावर कारवाई करण्यात यावी.

* मार्केटबाहेरील बेकायदा वस्तू विक्रींमुळे गांधी मार्केटमधील दुकानदारांच्या व्यवसायावर विपरीत परिणाम होत आहे. जुन्या रेल्वे स्थानकाजवळ दर रविवारी चोर बाजार भरतो. तो कायमचा बंद करण्यात यावा. मार्केटच्या सभोवतालचे नाले, गटारांची देखभाल करावी. इतर डागडुजीची कामे करावी.

हेही वाचा