संस्कृतींमधील फरक

ऑस्ट्रेलिया संघाने विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ज्या सर्वोत्कृष्ट खेळाचे दर्शन घडवले होते, त्याच संघाकडून विश्वचषक जिंकल्यानंतर त्या चषकाचा झालेला अवमान हा चाहत्यांनाही पचलेला नाही. पण यात जास्त वाईट वाटून घेण्याचे कारण नाही. जगातील वेगवेगळ्या संस्कृतींमधील हा फरक आहे, असे म्हणून या गोष्टीकडेही खेळकर वृत्तीने पाहणेच योग्य ठरले.

Story: अग्रलेख |
20th November 2023, 09:46 pm
संस्कृतींमधील फरक

क्रिकेट विश्वचषकावर ऑस्ट्रेलियाने आपले नाव कोरले. भारताची विजयाची संधी ऑस्ट्रेलियाने सहजपणे हिरावून घेतली. मैदानावरील सव्वा लाख प्रेक्षकांचा पाठिंबा भारतीय संघाला असतानाही कुठलाच दबाव न ठेवता ऑस्ट्रेलियाने अत्यंत चांगला खेळ करत विश्वचषकावर नाव कोरले. ही काही पहिली दुसरी वेळ नाही. ऑस्ट्रेलियाने सहावेळा विश्वचषक पटकावला आहे. यावेळी भारत जिंकेल, असे वाटत असताना अंतिम सामन्यात भारताच्या बेभरवंशी खेळामुळे ऑस्ट्रेलिया संघ विजयी झाला. बऱ्याच वर्षांनंतर यावेळी विश्वचषकावर भारतच आपला हक्क सांगेल, अशी स्थिती होती. या स्पर्धेतील सलग सर्व सामने जिंकून अंतिम सामन्यात पोहचलेल्या भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाकडून दारुण पराभव स्वीकारावा लागला. सामन्याची सुरुवात चांगली झाली होती, पण रोहित शर्माने थोडी घाई केली आणि तिथूनच भारताचा खेळ पुढे बिघडत गेला. विराट कोहली, के. एल. राहुल यांचा खेळ जरी ठीक होता तरी तो संघासाठी काहीच फायद्याचा नव्हता, हे भारताची फलंदाजी संपली आणि जी धावसंख्या पदरात होती, ते पाहून स्पष्ट झाले होते. 

ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी अंतिम सामन्यात केलेली रुबाबदार खेळी ही चांगल्या खेळाचा अनुभव दर्शवणारी होती. ऑस्ट्रेलिया हा संघही क्रिकेटमधील शक्तिशाली संघ, त्यामुळे सामन्याच्या सुरुवातीपासूनच बहुतेकांमध्ये एक धाकधूक होती. शिवाय मॅक्सवेलसारख्या खेळाडूने काही दिवसांपूर्वीच लगावलेल्या दुहेरी शतकाचा दबदबा अजूनही होता. इतर संघांसोबत ऑस्ट्रेलियाचेही सामने भारतासारखेच चांगले दमदार झाले होते. पण ८ ऑक्टोबरचा सामना पाहिला तर भारताने ऑस्ट्रेलियाला सहज पराभूत केले होते. त्यामुळे अंतिम सामन्यात असा काही चमत्कार होईल असे वाटत होते, पण ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी भारताला संधीच दिली नाही. भारताचे फलंदाज आणि गोलंदाजही काहीच चमत्कार करू शकले नाहीत. सोशल मीडियावर आता गुजरातला सामना नेण्याच्या निर्णयावरही टीका सुरू झाली आहे. सगळ्या गोष्टी गुजरातला नेण्याचा सोसही भारताच्या पराभवाला कारण आहे, असे अनेकजण मानत आहेत. मुंबईसारख्या ठिकाणीही अंतिम सामना खेळणे शक्य होते. १९८३ मध्ये कपिल देवच्या नेतृत्वाखाली आणि नंतर २०११ मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली दोनवेळा भारताने क्रिकेट विश्वचषकावर नाव कोरले होते. यावेळीही चांगली संधी होती. दमदार खेळी करत भारतीय संघ अंतिम सामन्यात आला होता, पण खेळाडूंकडून शांत खेळी करण्यापेक्षा घाईचे प्रदर्शन जास्त झाले. शेवटी ऑस्ट्रेलियाला विश्वचषकाचा मान मिळाला. 

ऑस्ट्रेलियाच्या या विजयानंतर नव्या वादाला सुरुवात झाली. ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू मिशेल मार्शने विश्वचषकावर दोन्ही पाय ठेवून काढलेला फोटो व्हायरल झाल्यामुळे ऑस्ट्रेलिया संघावरच टीकेची झोड उठली. हातात बीयर आणि दोन्ही पाय विश्वचषकावर ठेवून बसलेल्या मार्शचा फोटो पॅट कमिन्सने शेअर केला होता. कदाचित ऑस्ट्रेलियन संस्कृतीत ही गोष्ट आक्षेपार्ह नसेलही, पण जगभरातून या कृतीमुळे ऑस्ट्रेलिया संघाला टीकेचा सामना करावा लागत आहे. विश्वचषक जिंकल्याचा माज चढल्यामुळे ही कृती मार्शने केल्याची चर्चा समाजमाध्यमावर सुरू झाली. विश्वचषकाचा हा अवमान असल्याचे नेटिझन्सनी म्हटले आहे. ही कृती जगातील क्रिकेटप्रेमींना आक्षेपार्ह दिसत असली तरी ऑस्ट्रेलिया संघाने ती आक्षेपार्ह मानलेली नाही. कारण तसे असते तर त्या संदर्भातील फोटो त्यांच्याच खेळाडूकडून सोशल मीडियावर पोस्ट झाला नसता. विश्वचषक जिंकल्यानंतर त्यावर आरामात पाय ठेवून बसणे, यातही कदाचित ऑस्ट्रेलियन संस्कृतीचा गर्व असेल. पण भारतीय आणि विश्वचषकाला महत्त्व देणाऱ्या इतर देशांतील क्रिकेटप्रेमींना ऑस्ट्रेलियन खेळाडूंची ही गोष्ट आवडलेली नाही. क्रिकेटच्या चाहत्यांकडून आयसीसीने यावर कारवाई करण्याची मागणीही होत आहे. जगभरातील क्रिकेटच्या चाहत्यांनी मार्शच्या या वर्तवणुकीचा निषेध केला आहे. चांगला खेळ करण्याची क्षमता असलेल्या खेळाडूंकडून चांगल्या वर्तवणुकीचीही लोक अपेक्षा ठेवतात. त्यामुळेच जगातील महान खेळाडू बहुतांशी विनम्र असतात. विनम्र राहता येणे हाही चांगल्या खेळाचाच भाग असतो. ऑस्ट्रेलिया संघाने विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ज्या सर्वोत्कृष्ट खेळाचे दर्शन घडवले होते, त्याच संघाकडून विश्वचषक जिंकल्यानंतर त्या चषकाचा झालेला अवमान हा चाहत्यांनाही पचलेला नाही. पण यात जास्त वाईट वाटून घेण्याचे कारण नाही. जगातील वेगवेगळ्या संस्कृतींमधील हा फरक आहे, असे म्हणून या गोष्टीकडेही खेळकर वृत्तीने पाहणेच योग्य ठरले.