उत्कृष्ट कामगिरी करून सरकारचे लक्ष वेधा : मंत्री गोविंद गावडे

Story: क्रीडा प्रतिनिधी। गोवन वार्ता |
16th November, 11:38 pm
उत्कृष्ट कामगिरी करून सरकारचे लक्ष वेधा : मंत्री गोविंद गावडे

फोंडा : उत्कृष्ट कामगिरी करून सरकारला दखल घेण्यास प्रवृत्त करणे हेच प्रत्येक खेळाडूचे यश आहे. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत गोव्याची कामगिरी उत्कृष्ट ठरली आहे. स्पर्धेमुळे गोव्याच्या नावाची चर्चा भारतात अधिक चर्चेत आली हेच खरे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे यश असल्याचे उद्गार क्रीडा मंत्री गोविंद गावडे यांनी काढले आहेत.

फोंडा येथे युनायटेड ट्राईबल्स असोसिएशन अलायन्स (उटा) आयोजित बिरसा मुंडा जयंतीच्या कार्यक्रमात क्रीडा मंत्री गोविंद गावडे बोलत होते. यावेळी माजी आमदार वासुदेव मेंग गावकर, उटाचे अध्यक्ष प्रकाश वेळीप, दुर्गादास गावडे, जिल्हा पंचायत शुभना वेळीप, नारायण कामत, विश्वास गावडे व रोमाल्डो गोन्साल्वीस आदी मान्यवर उपस्थित होते.

अनुसूचित जमातीच्या खेळाडूंनी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. स्पर्धेमुळे सरकारवर टीका झाली तरी स्पर्धा यशस्वी करण्यात मोठे यश प्राप्त झाले. त्यात गोव्यातील खेळाडूंनी चांगले प्रदर्शन करून लोकांची मने जिंकली. उटा संघटना समाजाच्या उन्नतीसाठी प्रयत्नशील आहे. त्याच बरोबर अधिकार प्राप्त करण्यासाठी संघटना गेल्या काही वर्षांपासून संघर्ष करीत आहे. भविष्यात निश्चित संघर्षातून चांगले फळ मिळणार असल्याचे क्रीडा मंत्री गोविंद गावडे यांनी सांगितले.

क्रीडा मंत्री गोविंद गावडे यांच्या हस्ते नेहा गावकर, प्रतीक्षा वेळीप, योगिता वेळीप, सुरज वेळीप, चंद्रहास वेळीप व दर्शन वेळीप, बाबू गावकर, प्रज्योत सोलयेकर, नारायण गावडे, उत्तेज गावडे, संतोष गावकर, नितेश जल्मी या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पदक प्राप्त केलेल्या खेळाडूंचा गौरव कारण्यात आला. तसेच उटा संघटनेतर्फे प्रकाश वेळीप यांच्या हस्ते स्पर्धा यशस्वी केल्याबद्दल क्रीडा मंत्री गोविंद गावडे यांचा खास सत्कार करण्यात आला. दुर्गादास गावडे यांनी स्वागत तर विश्वास गावडे यांनी सर्वांचे आभार मानले. डॉ. उदय गावकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.