एक्सपायरी डेट उलटून गेलेले चिप्स दिल्यावरून थिवी​ रेल्वे स्टेशनवर हाणामारी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
26th September, 10:50 pm
एक्सपायरी डेट उलटून गेलेले चिप्स दिल्यावरून थिवी​ रेल्वे स्टेशनवर हाणामारी

म्हापसा : तारीख संपलेले चिप्स पाकीट दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून सिरसई येथे थिवी रेल्वे स्थानकाच्या आवारातील दुकानात घुसून दुकान कर्मचाऱ्यांना मारझोड करण्याची घटना घडली. या प्रकरणी कोलवाळ पोलिसांनी परस्परविरोधी गुन्हा दाखल केला आहे.

ही घटना बुधवारी उत्तर रात्री १.३० वा. सुमारास घडली. थिवी येथील संशयित शिवम परब, विघ्नेश च्यारी व इतर ४-५ जणांचा गट सात दिवसीय गणेश विसर्जनानंतर थिवी रेल्वे स्थानकावर गेला होता. तिथे रेल्वे स्थानकाच्या आवारातील शिवप्रसाद सिंग यांच्या दुकानातून संशयितांनी चिप्स पाकीट खरेदी केले. खरेदी केलेल्या पाकिटाची खाण्यायोग्य मुदतीची तारीख संपली (एक्सपायरी डेट) असल्याचे त्यांना दिसून आले. त्यांनी याचा जाब दुकानात येऊन दुकान मालक व कामगारांना विचारला. तेव्हा त्यांच्यात वादावादी झाली व प्रकरण शिवीगाळ आणि हातघाईवर गेले.

संशयितांचा गट दुकानात कामगारांना मारण्यासाठी घुसला. त्यावेळी दुकानात तिघेजण होते. त्यातील एकाने दंडुका घेत प्रतिहल्ला केला. पण संशयितांनी त्यास पकडून बराच चोप दिला. तसेच इतरांनाही काचेच्या बाटल्या व इतर साहित्य घेऊन मारहाण केली. या मारझोडीत दोन्ही बाजूचे लोक जखमी झाले.

या प्रकरणी कोलवाळ पोलिसांनी थिवीतील संशयित रहिवाशांविरूद्ध भा.दं.सं.च्या ५०४, ३२४, ५०६(२), ४२७ व १४९ कलमाअंतर्गत तर दुकान मालक आणि कर्मचाऱ्यांविरूद्ध भा.दं.सं.च्या ५०४, ३२४ व ३४ कलमाखाली परस्परविरोधी गुन्हा दाखल केला.

दरम्यान, संशयितांकडून पुन्हा असा अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी दोन्ही बाजूच्या संशयितांविरूद्ध अहवाल बार्देश उपजिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला आहे.

पुढील तपास पोलीस उपअधीक्षक जिवबा दळवी व निरीक्षक विजय राणे सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक भरत खरात व हवालदार सिताराम चोडणकर करीत आहेत.

हेही वाचा