लैंगिक अत्याचारप्रकरणी संशयित शिक्षकाला अटकपूर्व जामीन

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
26th September, 12:33 am
लैंगिक अत्याचारप्रकरणी संशयित शिक्षकाला अटकपूर्व जामीन

मडगाव : मडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत २०१२ ते १४ या कालावधीत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी संशयित अर्जुन गवंडे या शिक्षकाला बाल न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आलेला आहे.
मडगाव पोलीस ठाण्याच्या परिक्षेत्रातील शिक्षकाकडून विद्यार्थिनीवरच लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार नोंद झाल्यानंतर मडगाव पोलिसांकडून संशयित शिक्षक अर्जुन गवंडे याच्याविरोधात ऑगस्ट महिन्यात गुन्हा नोंद केलेला होता. लैंगिक अत्याचाराची घटना २०१२ ते २०१४ या दोन वर्षांच्या कालावधीत घडलेली असून तक्रारीनंतर पोलिसांकडून भादंवि कलम ३५४, ३७६, गोवा बाल कायदा कलम ८ (२) व बाल संरक्षण कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. याप्रकरणी संशयित शिक्षक गवंडे यांनी बाल न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज सादर केलेला होता, त्यानुसार बाल न्यायालयाकडून संशयिताला २० हजार रुपयांचा बाँड, तेवढ्याच रकमेचा हमीदार व १५ दिवस सकाळी १० ते १ वाजेपर्यंतच्या कालावधीत मडगाव पोलीस ठाण्यात हजेरी लावण्याच्या अटीशर्तीवर अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आलेला आहे.

कुंकळ्ळीतील ‘त्या’ शिक्षकाच्या जामिनावर उद्या सुनावणी
कुंकळ्ळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शारीरिक शिक्षक रमेश गावकर याच्याविरोधात विद्यार्थिनीकडून विनयभंग केल्याची तक्रार नोंद करण्यात आल्यानंतर त्याला अटक झालेली आहे. त्यानंतर आणखीही काही मुलींनी शिक्षकाकडून विनयभंग केल्याची तक्रार केलेली होती. स्थानिकांकडून सदर शिक्षकाला बडतर्फ करण्याची मागणी करण्यात आलेली आहे. सध्या हा शिक्षक न्यायालयीन कोठडीत असून बाल न्यायालयात जामिनासाठी अर्ज केलेला आहे. या अर्जावर बुधवार, २७ सप्टेंबर रोजी सुनावणी केली जाणार आहे.
...                

हेही वाचा