पाण्याची भांडी रिकामी करा, डेंग्यूपासून सुरक्षित रहा!

डॉ. नाझारेथ : हळदोणा आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
26th September 2023, 12:18 am
पाण्याची भांडी रिकामी करा, डेंग्यूपासून सुरक्षित रहा!

म्हापसा : डेंग्यूच्या संशयित प्रकरणांमध्ये वाढ होत असल्याने लोकांनी त्यांच्या आसपासची पाणी साठवणारी भांडी व इतर वस्तू आठवड्यातून एकदा रिकामी कराव्या. ही भांडी रिकामी केल्यामुळे डेंग्यूचा आजार तसेच डास निर्मिती कमी होण्यास मदत होईल, असे आवाहन हळदोणा आरोग्य केंद्राचे आरोग्याधिकारी डॉ. रोशन नाझारेथ यांनी केले आहे.

ज्या लोकांना ताप येत आहे, त्यांनी लगेच आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा. त्यामुळे कोणत्याही रोगाचा प्रसार रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना लवकरात लवकर हाती घेणे शक्य होईल, असेही आवाहन डॉ. नाझारेथ यांनी केले आहे.
उपलब्ध माहितीनुसार, हळदोणा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात डेंग्यू रुग्णांची संख्या वाढत आहे. यंदा जानेवारी ते जुलैपर्यंत डेंग्यूचे केवळ सात रुग्ण सापडले, तर ३६ संशयित रुग्ण आढळले आहेत. मात्र ऑगस्टपासून या रुग्णांत वाढ झाली आहे. ऑगस्टमध्ये २० रुग्ण आढळले, त्यात दोघांना डेंग्यू झाल्याची पुष्टी मिळाली. आतापर्यंत सप्टेंबरमध्ये चार डेंग्यूचे रुग्ण सापडले तर २० संशयित रुग्णांचा समावेश आहे. या आरोग्य केंद्राच्या हद्दीतील मयडे गाव हा डेंग्यूसाठी अतिसंवेदनशील ठरला आहे.
गणेशोत्सवापूर्वी दोन आठवडे सरपंच आणि पंचायतीच्या सहकार्याने आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी विशेष मोहीम राबवली होती. त्यावेळी दोन संशयित आणि एका डेंग्यू रुग्णाची पुष्टी झाल्याची नोंद झाली. अशाच प्रकारे आरोग्य केंद्राच्या हद्दीतील गावांमध्ये भांड्यांमध्ये साठवलेले पाणी रिकामी करण्याची मोहीम राबवली जाणार आहे. जेणेकरून डासांची पैदास केंद्रे रिकामी राहतील आणि डासांची उत्पत्ती टाळता येईल. कारण एक डास सुमारे ३०० अंडी घालतो, त्यातील सुमारे १५० अंड्यांत डेंग्यूचे विषाणू तयार होतात. एकाद्या व्यक्तीने आठवड्यातून एकदा आपल्या घरातील भांडी रिकामी केल्यास डेंग्यूचे रुग्ण कमी होण्यास मदत होऊ शकते, असे डॉ. नाझारेथ यांनी सांगितले.                     

आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांमुळे परिसरातील पाणी साठवलेली भांडी रिकामी करण्यासह हळदोणा आरोग्य केंद्राअंतर्गत डेंग्यूची परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. साठवलेले पाणी रिकामे करण्याची मोहीम आम्ही हाती घेतली आहे.
- डॉ. रोशन नाझारेथ, हळदोणा आरोग्य केंद्राचे आरोग्यधिकारी
हेही वाचा