भाजपला पुन्हा सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी देशातील सर्व विरोधी पक्षांनी मिळून ‘इंडिया’आघाडीची स्थापना केली. भाजपविरोधात असलेले काँग्रेस, आप, तृणमूल काँग्रेस तसेच अन्य राजकीय पक्ष यात सहभागी झाले होते. या पक्षांनी एकमेकांविरोधात न लढण्याचे ठरविले होते. मात्र, आता समाजवादी पक्षाने काँग्रेसची सत्ता असलेल्या छत्तीसगडमध्ये आपले उमेदवार उभे करण्याचे जाहीर केल्याने लोकसभा निवडणुकांआधीच ‘इंडिया’ला खिंडार पडणार अशी स्थिती निर्माण झाली आहे.
इंडिया आघाडीच्या देशात अनेक बैठक झाल्या. भाजपला रोखण्यासाठी इंडिया आघाडीची स्थापना करण्यात आली असली तरी लोकसभेपूर्वी पाच राज्यांत निवडणुका होत आहेत. मात्र, या विधानसभा निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात इंडिया आघाडीतील पक्ष निवडणूक लढविणार असल्याचे काही राज्यांत दिसत आहे. इंडिया आघाडीत आता २८ पक्ष एकत्र आले आहेत. त्यापैकी काँग्रेस मोठा व महत्त्वाचा पक्ष आहे. काही दिवसांपूर्वीच समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव म्हणाले होते की, ज्या ठिकाणी जो पक्ष शक्तिशाली आहे, त्याला त्या ठिकाणी लढू दिले पाहिजे. असे असताना मध्य प्रदेशनंतर आता छत्तीसगड विधानसभा निवडणूक लढविण्याच्या समाजवादी पक्षाच्या निर्णयावर आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
समाजवादी पक्षाच्या छत्तीसगड संघटनेने राज्यातील विधानसभेच्या ९० जागांपैकी ४० मतदारसंघांत निवडणूक लढविण्याचा प्रस्ताव दिला आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोराम या राज्यांत काही महिन्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. मध्य प्रदेशमध्ये काँग्रेस विरोधी पक्ष असून सत्ताधारी भाजपाला सत्तेपासून दूर करण्यात ते प्रबळ दावेदार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडीकडून उत्तर प्रदेशमध्ये अधिकाधिक जागा मिळण्यासाठी समाजवादी पक्षाकडून छत्तीसगड आणि मध्य प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीत उतरण्याची तयारी केली जात आहे. समाजवादी पक्ष हा उत्तर प्रदेशमध्ये सत्ताधारी भाजपचा प्रमुख विरोधी पक्ष आहे. छत्तीसगडमध्ये निवडणूक लढविण्यासंदर्भात राज्यातील नेत्यांशी अखिलेश यादव चर्चा करणार आहेत. त्यानंतर अनेक निर्णय घेतले जाणार आहेत.
छत्तीसगडमध्ये २०१८ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत सपाने १० मतदारसंघात उमेदवार उभे केले होते. मात्र, एकालाही विजय मिळवता आला नव्हता. यावेळी ४० मतदारसंघात उमेदवार उभे करण्याचा पक्ष विचार करत आहे. इंडिया आघाडीमध्ये काँग्रेसशी आघाडी केलेली आहे. मात्र, ही आघाडी लोकसभा निवडणुकीसाठी असल्याचे सपाच्या प्रदेशाध्यक्षानी सांगितले आहे. सपाच्या या निर्णयामुळे इंडिया आघाडीवर परिणाम होणार का? याबाबत चर्चा सुरू आहे.